Latest

नांदेड : शेल्लाळी येथील शेतकर्‍याने पिकवला पडीक जमिनीत शिंपला मोती; वर्षभरात १४ लाखांचे उत्पन्न

अविनाश सुतार

कंधार : भागवत गोरे : मोती हा समुद्रातच मिळतो, असा समज असला तरी कंधार तालुक्यातील शेल्लाळी येथील भास्कर केंद्रे व शिवहारी केंद्रे या भावंडांनी आपल्या कोरडवाहू व नापिक असलेल्या शेतात ८० फूट बाय १०० फुटाच्या शेततळ्यात शिंपला मोती संवर्धन करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. पहिल्या वर्षी या व्यवसायातून तब्बल १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

शेल्लाळी येथे मारोती महाजन केंद्रे, रामराव महाजन केंद्रे, माणिक महाजन केंद्रे व देविदास महाजन केंद्रे या चार भावंडांना प्रत्येकी १६ एकर जमीन आहे. यातील मारोती महाजन केंद्रे हे महात्मा गांधी मिशनच्या औरंगाबाद येथील कॉलेजमध्ये नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा भास्कर मारोतु केंद्रे यांनी औरंगाबाद येथे शिंपला मोती संगोपनाचे प्रशिक्षण घेतले. याच प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ८० बाय १०० फुटांचे शेततळे घेतले.

२०२०- २१ मध्ये या शेततळ्यात ६ हजार ३०० शिंपला मोतीचे संगोपन केले. ते ८५ रुपये प्रति नग याप्रमाणे खरेदी केले. यातील शिंपला मोती मृत झाला. तर १०० टक्के विमा लागू आहे. तर खरेदी किंमत प्रतिनग ४५० रुपये असा होता. पहिल्या वर्षी शिंपला मोती संगोपनाच्या माध्यमातून १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी भास्कर केंद्रे यांच्यासोबत त्यांचा चुलत भाऊ शिवदास केंद्रे यांनी आपल्या शेतातील १०० बाय १०० च्या शेततळ्यात ७ हजार शिंपला मोती तर भास्कर केंद्रे यांच्या शेततळ्यात ११ हजार शिंपला मोती संगोपन सुरु आहे.

शिवहारी केंद्रे हे एस.टी. महामंडाळत बस चालक आहेत. नोकरी करत या व्यवसायाकडे लक्ष देतात. तर इतर वेळी त्यांचे आई-वडील या व्यवसायासोबत कुक्कुटपालनाकडे लक्ष देतात. सध्या यांच्या शेतात तीन शेडमध्ये कुक्कुटपालन केले जात आहे. जर या दोन्ही व्यवसायाचे साथ दिली तर करोडो रुपयाचे उत्पन्न मिळू शकते.

शिंपला मोतीसाठी विमाकवच

शिंपला मोती संगोपन व्यवसायात २०२०-२१ साली खरेदी किंमत जेवढी असेल. तेवढाच म्हणजे १०० टक्के विमा लागू होता. सध्या हा विमा कमी करण्यात आला असून ५० टक्के करण्यात आला आहे. प्रत्येक संगोपनाच्या वेळी सुमारे २० टक्के शिंपला मोती मृत होत असतो. त्यासाठी विमा कवच असल्याने फार नुकसान होत नाही.

जाग्यावर खरेदी-विक्री

शेल्लाळी येथे दोन शेततळ्यात सध्या १८ हजार शिंपला मोतीचे संगोपन करण्यात येत आहे. या शिंपला मोती विक्री व खरेदी करण्याचे काम औरंगाबाद येथील धनश्री पार्ल कंपनी करते. त्यामुळे शिंपला मोतीचे संगोपन करत असताना शेतकर्‍यांपुढे खरेदी-विक्रीसाठी बाजारपेठ शोधण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही.

सोबतच मत्स्यपालन

भास्कर केंद्रे व शिवदास केंद्रे यांनी आपल्या दोन्ही शेततळ्यात १८ हजार शिंपला मोती संगोपनासोबतच प्रति ५ हजार अशा १० हजार सिफरनस जातीचे मत्स्यपालन बिज सोडले आहे. या मासळीला बाजारात चांगली मागणी असून किंमतही चांगली मिळते.

कुक्कुटपालनाची जोड

अतिशय मुरबाड व कोरडवाहू जमिनीत शिंपला मोती संगोपन करत असताना केंद्रे कुटुंबियांनी तब्बल तीन शेडमधून कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये माणिक महाजन केंद्रे यांनी १ हजार १००, देविदास महाजन केंद्रे यांनी १ हजार तर शिवहारी रामराव केंद्रे यांनी १ हजार असे तीन शेडमध्ये ३ हजार १०० पिल्लांचे कुक्कुटपालन केले आहे.

केवळ दहा हजारांचा खर्च

९० रुपये प्रति नगाने शिंपला मोतीची खरेदी केल्यानंतर यांचे एक वर्ष संगोपन करावे लागते. एक वर्षात शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. या एक वर्षाच्या संगोपनासाठी १० हजार रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. एका जाळीत दहा शिंपला मोती ठेवून शेततळ्यात मोठ्या लांब दोरीला बांधले जाते. त्यानंतर वर्षभर संगोपनासाठी पाण्याच्या व्यवस्थेशिवाय काहीही करायची गरज पडत नाही. अतिशय कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. यासाठी केवळ मानसिक तयारी आवश्यक आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT