चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान रोखण्यासाठी स्वत:च्या शेतात पहारा देणा-या एका 52 वर्षीय शेतक-याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना आज (दि ६ ) पहाटे राजूरा तालुक्यातील विरूर वनपरिक्षेत्रात घडली. भीमराव भद्रू घुघलोत (52) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो थोमापूर येथील रहिवासी होता.
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रातील थोमापूर परिसरात सध्या शेतपिकांचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी रात्री शेतात पाहारा देत आहेत. शनिवारच्या रात्री भीमराव घुघलोत शेतातील पिकांचे नुकसान रोखण्यासाठी गेला होता. वन्यप्राण्यांचा धोका लक्षात घेता शेतात उभारलेल्या मचाणीवर जागलीनंतर झोपला होता.
पहाटे 4 वाजताच्या सुमारास बिबट्याने मचाणीवर झोपून असलेल्या शेतकऱ्याला वर चढून हल्ला केला. सुमारे तीनशे मीटर लांब दूरवर फरफटत नेले. शेतक-याने बिबट्याचा हल्ला होताच प्रचंड आरडआओरड केली. लगतच्या काही शेतक-यांना आवाज येताच त्यांनी जावून बघितले असता बिबट त्या शेतक-याला ओढत नेत असल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेमुळे परिसरात हशत निर्माण झाली असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतक-यांनी वनविभागाकडे केली आहे. दोन वर्षांनंतर वाघाचे या क्षेत्रात पुन्हा हल्ले वाढत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. आता पिकांची राखण कशी करायची, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
हेही वाचा