Latest

Papua New Guinea earthquake | महापुराने वेढलेल्या पापुआ न्यू गिनीमध्ये ६.९ तीव्रतेचा भूकंप, ५ मृत्यू, हजारो घरे उद्ध्वस्त

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : उत्तर पापुआ न्यू गिनीमध्ये ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे १ हजारहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. रविवारी हा प्रदेश भूकंपाने हादरला होता. "यात आतापर्यंत १ हजारहून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे," असे ईस्ट सेपिकचे गव्हर्नर ॲलन बर्ड यांनी सांगितले. हा भाग आधीच पुराने वेढलेला आहे. यादरम्यान रविवारी सकाळी झालेल्या भूकंपामुळे या प्रांतातील बहुतांश भागांचे मोठे नुकसान झाले. आपत्कालीन कर्मचारी अजूनही नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत", असेही ते म्हणाले. (Papua New Guinea earthquake)

वेवाकच्या नैऋत्येस सुमारे ८८ किलोमीटर (५४ मैल) अंतरावर हा भूकंप झाला, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने दिली आहे. वेवाक ही पापुआ न्यू गिनीच्या पूर्व सेपिक प्रांताची राजधानी आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंप होणे सामान्य आहे. कारण हा प्रदेश भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. रविवारी झालेल्या भूकंपाचे सेपिक नदीकाठची गावे आणि आजूबाजूच्या भागाला हादरे बसले.

जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने आधीच पापुआ न्यू गिनीमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भूस्खलनही झाले आहे. आता भूकंपामुळे येथील परिस्थिती बिकट बनली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी १८ मार्च रोजी चिंबू प्रांतात झालेल्या ३ भूस्खलनात २३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते.

ॲलन बर्ड पुढे म्हणाले की, "पुराने प्रत्यक्षात ८०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा परिसर वेढला आहे. सेपिक नदीकाठची सुमारे ६० ते ७० गावांना याचा फटका बसला आहे." प्रशासनाने या आठवड्यात पूरग्रस्त भागात बचावकार्य करण्याची तयारी केली होती. वैद्यकीय पथकेही सज्ज करण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने शेकडो घरे उद्ध्वस्त झाली, असे बर्ड यांनी सांगितले.

भूकंपग्रस्त झोनमधील लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत आणि समुदायांना आता अन्न आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. "पण हा असा भूकंप होता, ज्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यामुळे सर्वात मोठे नुकसान झाले आहे." असेही ते म्हणाले.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या देशाच्या आतील भागात ७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यात किमान सात लोकांचा मृत्यू झाला होता. बेटांनी बनलेल्या या देशातील ९० लाख नागरिकांपैकी बरेच लोक शहरांच्या बाहेर राहतात. हा भाग दुर्गम असल्याने तेथे बचावकार्य करण्यास अडथळे येऊ शकतात. (Papua New Guinea earthquake)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT