रोम : पृथ्वीवरील मानवी वसाहत आणि महासागरांनंतर जो धरतीचा भाग शिल्लक राहतो, त्याच्या मोठ्या हिश्श्यात जंगलांचे अस्तित्व आहे. जगात माणसांची गणती केली जाऊ शकते; पण झाडांची गणती करता येणे कठीण आहे. एका नव्या संशोधनानुसार पृथ्वीवर झाडांच्या किंवा वनस्पतींच्या 73 हजार प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यापैकी 9200 प्रजाती अशा आहेत ज्यांची अद्यापही माणसाला माहिती नाही.
संशोधकांचे म्हणणे आहे की या अज्ञात प्रजातींपैकी बहुतांश प्रजाती दुर्लभ आणि अतिशय कमी संख्या असलेल्या आहेत. मानवाच्या विकासामुळे त्यांना धोकाही निर्माण झालेला असू शकतो. दक्षिण अमेरिकेत जगातील सुमारे 43 टक्के वनस्पती प्रजाती आहेत. जगातील सर्वात दुर्मीळ वनस्पती प्रजाती इथेच पाहायला मिळतात. येथील जंगले जैवविविधतेने संपन्न आहेत. सुमारे तीन वर्षांच्या संशोधनानंतर याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या योजनेत 150 संशोधकांनी सहभाग घेतला आणि 64 हजार प्रजातींशी संबंधित सुमारे 4 कोटी वनस्पतींची ओळख केली.
बोलोग्ना विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधनाचे प्रमुख लेखक रॉबर्टो कॅजोला गट्टी यांनी सांगितले की वनस्पतींचा विकास आणि विविधता यांची व्यापक माहिती असणे आवश्यक आहे. हे संशोधन 'ग्लोबल फॉरेस्ट बायोडायव्हर्सिटी इनिशिएटिव्ह' अंतर्गत करण्यात आले आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सुपरकॉम्प्युटर्सचा वापर करून जटिल सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार हे अनुमान लावण्यात आले की पृथ्वीवर सुमारे 73,300 वनस्पती प्रजाती असून त्यापैकी 14 टक्के प्रजाती अद्याप अज्ञात आहेत.
हेही वाचा