Latest

एप्रिल महिन्यात ६६१ लाख टन कोळसा उत्पादन !

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात कोळशा अभावी अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत असल्याने सर्वसामान्यांवर भारनियम लादले जात आहे. केंद्र सरकार कोळशामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात देशांतर्गत ६६१.५४ लाख टन कोळसा उत्पादन घेण्यात आल्याची माहिती कोळसा मंत्रालयाने दिली आहे. कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि तिच्या उपकंपन्यांनी ५३४.७ लाख टन कोळशाचे उत्पादन घेतले, तर सिंगारेनी कोलियारीज कंपनी लिमिटेडने (एससीसीएल) ५३.२३ लाख टन कोळशाचे उत्पादन घेतले. बंदिस्त खाणींमधून गेल्या महिन्यात झालेले उत्पादन हे ७३.६१ लाख टन एवढे होते.

गेल्या महिन्याभरात एकूण ७०८.६८ लाख टन कोळशाची आवक झाली. तर, उर्जा क्षेत्रातील आवक एप्रिलमध्ये ६१७.२ लाख टनांवर पोहोचली. दरम्यानच्या काळात कोल इंडियाकडून ऊर्जा क्षेत्रासाठी ४९७.३९ लाख टन एवढी आवक झाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. कोल इंडियाने या वर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक ५३४.७ लाख टन उत्पादन केले असून त्यात ६.०२% वाढ नोंदवण्यात आली आहे. यापूर्वीचे सर्वोच्च उत्पादन एप्रिल २०१९ मध्ये ४५०.२९ लाख टन एवढे होते. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये केवळ कोल इंडिया मधून झालेली कोळशाची आवक ५७०.५५ लाख टन इतकी होती. यापूर्वीची सर्वाधिक आवक एप्रिल २०२१ मध्ये ५४०.१२ लाख टन इतकी नोंदवली गेली होती.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण कोळसा उत्पादन ७७७०.२३ लाख टन झाले, ज्यात गतवर्षी पेक्षा ८.५५% वाढ नोंदवली गेली आहे. तर २०२०-२१ मधील आवक ७१६० लाख टन इतकी होती. सीआयएलचे उत्पादन २०२०-२१ मधील ४.४३ टक्क्यांनी वाढत ५९६०.२४ लाख टन वरून २०२१-२२ या आर्थिक वर्षात ६२२०.६४ लाख टन झाले आहे. एससीसीएलने २०२१-२२ मध्ये २८.५५% वाढीसह ६५०.०२ लाख टन उत्पादन घेतले. गतवर्षी हे उत्पादन ५००.५८ लाख टन होते.

बंदिस्त खाणींतील कोळसा उत्पादन ८९०.५७ लाख टन झाले आहे; जे २०२०-२१ मध्ये केवळ ६९०.१८ लाख टन होते. २०२१-२२ मध्ये एकूण ८१८०.०४ लाख टन कोळशाची आवक झाली आहे. जी मागील वर्षी ६९००.७१ लाख टन होती, यावर्षी त्यात १८.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत, सीआयएलने २०२०-२१ च्या ५७३०.८० लाख टन कोळशाच्या तुलनेत यावर्षी ६६१०.८५ लाख टन कोळसा पाठवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT