पुढारी ऑनलाईन डेस्क : सौदी अरेबिया आणि ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यापासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज सुमारे १.१६ दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली आहे. वाढत्या महागाईच्या काळात तेल निर्यातदार देशांनी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे जगभरासह भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ (Oil prices) होण्याची शक्यता आहे
त्यामुळे आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ५ ते ६ टक्क्यांनी (Oil prices) वाढ झाली आहे. ओपेक देशांचे हे धक्कादायक पाऊल असून त्यामुळे येत्या काही दिवसांत तेलाच्या किमती वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूक कंपनी पिकरिंग एनर्जी पार्टनर्सने सांगितले की, ज्या प्रकारे तेल उत्पादन कपातीची घोषणा करण्यात आली आहे, त्यानंतर तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे $ 10 ने वाढू शकते.
त्याच वेळी, सौदी अरेबियाने म्हटले आहे की, मे महिन्यापासून २०२३ च्या अखेरपर्यंत दरदिवस ५ लाख बॅरल तेल उत्पादन कमी करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे तेल बाजार स्थिर होण्यास मदत होईल. काही ओपेक आणि बिगर ओपेक देशांच्या संमतीने कपात केली जाईल. उत्पादनातील ही घट ऑक्टोबर २०२२ मध्ये घोषित केलेल्या कपातीच्या व्यतिरिक्त असेल.
पाकिस्तान रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची योजना आखली आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी सांगितले की, पुढील महिन्यात पाकिस्तान पहिली ऑर्डर देणार आहे .
दुसरीकडे, देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अधिसूचनेत, तेल रिफायनरी कंपन्यांना सांगण्यात आले आहे की, ते त्यांच्या वार्षिक पेट्रोल निर्यातीपैकी ५० टक्के आणि डिझेल निर्यातीच्या ३० टक्के देशांतर्गत बाजारात उपलब्ध करतील. याचा परिणाम अशा गैर-सरकारी कंपन्यांवर होऊ शकतो. जे रशियाकडून स्वस्त कच्चे तेल विकत घेऊन शुद्ध करतात. आणि इतर देशांना चढ्या दरात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करतात.
दरम्यान, रियाध आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी ताणले जाऊ शकतात. याचाही परिणाम कच्च्या तेलाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा