Latest

River News : देशातील 311 नद्यांची खोरी नामशेष होण्याच्या मार्गावर

अमृता चौगुले

पुणे : ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस दिवसेंदिवस कमी होत आहे, पाऊसमान लहरी होत आहे. पुराचे प्रमाण कमी तर दुष्काळी भागांची संख्या वाढत आहे. नद्यांची खोरी अरुंद होऊन नष्ट होत आहेत. त्यात मानवनिर्मित प्रदूषणामुळे तर स्थानिक भागातील नद्या नामशेष झाल्या. सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार जागतिक नदी दिन म्हणून पाळला जातो.

यंदा हा दिवस रविवारी 24 सप्टेंबर रोजी जगभर साजरा केला जात आहे. एकेकाळी नद्यांमुळे सुजलाम् सुफलाम् असणार्‍या भारतातील शेकडो छोट्या नद्या प्रदूषणामुळे नामशेष झाल्या आहेत; तर मध्यम लांबीच्या 603 नद्यांपैकी 311 नद्यांची खोरी अतिप्रदूषित झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गोदावरीचे खोरे सर्वाधिक प्रदूषित झाले आहे. गेल्या 15 वर्षांत देशाच्या 25 टक्के भूभागाचे वाळवंटीकरण झाले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या अहवालानुसार देशातील नद्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सन 2022-23 च्या अहवालानुसार देशात खूप मोठ्या, साधारण मोठ्या, मध्यम, लघू, अतिलघू अशा पाच प्रकारांत नद्यांचे वर्गीकरण करण्यात आले. याचा राज्यवार विचार केला तर 30 राज्यांतील 603 पैकी 311 नद्यांची खोरी अतिप्रदूषित अवस्थेत असून ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निरीक्षणानुसार देशातील 1920 स्थानांतील 603 नद्यांपैकी 311 नद्यांची खोरी शेवटच्या घटका मोजत आहेत. यात महाराष्ट्रातील एकूण 55 नद्यंचा समावेश आहे. यात मोठ्या चार नद्या असून, बाकी मध्यम व कमी लांबीच्या आहेत.

या नद्यांच्या खोर्‍यांना धोका

गंगा, गोदावरी, कावेरी, कृष्णा, नर्मदा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कांबी, मुशी, भीमा, गौतमी, महानदी, साबरमती या काही प्रमुख मोठ्या नद्या आहेत. त्यांची खोरी अतिप्रदूषित झाल्याने मोठी खोरीच नामशेष होण्याची भीती आहे.

गत 15 वर्षांत 25 टक्के भूभागाचे वाळवंटीकरण

आपल्या देशात वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होणारे नद्यांचे प्रदूषण हा विषय गंभीर वळणावर गेला आहे. मानवनिर्मित प्रदूषणामुळे गत 15 वर्षांत देशाच्या 25 टक्के भूभागाचे वाळवंटीकरण झाले आहे.

जगातील सर्वाधिक धरणे गंगा नदीवर

भगीरथ ऋषींनी ज्या गंगेला पृथ्वीवर आणले अशी आख्यायिका आहे, तिच्यावर जगात सर्वात जास्त धरणे बांधली गेली आहेत. दोन हजार 510 कि.मी. लांबीची गंगा नदी यामुळे समुद्रात मिळणे काही काळाने बंद होईल, अशी भीती नदी अभ्यासकांना वाटत आहे.

450 कोटींचा निधी दिला

या नद्यांचे शुद्धीकरण व त्यांची खोरी पुन्हा जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल 450 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. नदीचे शुद्धीकरण हे खूप मोठे आव्हान सरकारसमोर ठरत आहे.

नदी शुद्धीकरणाचे बजेट (कोटी रु.)

गोदावरी (आंध्र प्रदेश) ः13.26 तापी, साबरमती, भिडोळा (गुजरात) ः208.63
मुळा-मुठा (पुणे, महाराष्ट्र) ः 24.65 राणीचू (सिक्कीम) ः 58.42 नामबुक (मणिपूर) – 15 डिफू, दशिनी (नागालँड) ः 14

सर्वाधिक प्रदूषित खोरे

गोदावरी ः 65 ते 70 टक्के नर्मदा ः 60 टक्के कावेरी ः 40 टक्के

नद्यांचे उगमस्थान, संगम आणि समुद्राला कुठे मिळते हेच शोधणे आता कठीण काम झाले. अनेक नद्यांची खोरी नष्ट झाल्याने त्या आता समुद्राला मिळणे बंद झाले आहे. गंगा नदीवर तर जगातील सर्वात जास्त धरणे होत आहेत. त्यामुळे तिचे पाणी आता समुद्राला मिळणे बंद होईल. अशाच प्रकारामुळे रशियातील एक समुद्रच नष्ट झाला. अशी परिस्थिती भारतात येण्यास वेळ लागणार नाही.

– शैलजा देशपांडे
नदी अभ्यासक, पुणे

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT