नगर : पुढारी वृत्तसेवा : मी मंत्रालयात कामाला आहे. मंत्र्यांशी माझी ओळख असून, अनेकांची नोकरीचे कामे केली आहेत. दोघे मिळवून पाच लाख रुपये द्या, नोकरीचे काम करतो असे म्हणून दोन लाख 90 हजार रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात घेतल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गौरव दादासाहेब नरवडे (रा. खातगाव टाकळी, ता. नगर), प्रवीण तान्हाजी राडे (रा. मुंबई मंत्रालय) असे गुन्ह्यातील संशयित आरोपींची नावे आहेेत. सागर भरत मगर (वय 25, रा. देऊळगाव घाट, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून कोवताली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहेे.
काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे मेकिडलचे शिक्षण घेत आहे. माझा मित्र गौरव नरवडे आधून-मधून भेटण्यासाठी येत असतो. 8 जून 2022 रोजी गौरव माझ्याकडे आला आणि माझी ओळख मंत्रालयातील प्रवीण राडे याच्याशी आहे. तो तुला आणि मला सोबत आरोग्य विभागात नोकरी लावतो असे म्हणाला आहे. त्याच दिवशी गौरवने दुपारी फोन करून सांगितले की मित्र प्रवीण राडे नगरला आला आहे. आम्ही तिघे जण हॉटेलात भेटलो. प्रवीण राडे म्हणाले, मी मंत्रालयात कामाला आहे. माझी मंत्र्यांशी ओळख आहे. तुमच्या दोघांचे ताबडतोब काम करून देतो, मला पाच लाख रुपये द्या.
बाकी गौरवशी चर्चा करून सांगतो. त्यावेळी त्याने मंत्रालयाचे ओळखपत्र दाखविले. त्यामुळे तो मंत्रालयात कामाला असल्याचा विश्वास बसला. त्याला 10 ते 23 जुलै 2022 दरम्यान, गौरवच्या खात्यावरून व रोख स्वरूपात दोन लाख 90 हजार रुपये दिले. गौरव नरवडे यानेही प्रवीण राडेे याच्या खात्यावर वर्ग केल्याचे मोबाईलमध्ये स्क्रीन शॉट दाखविले. काही दिवसांनी गौरव व प्रवीण राडे यांच्याशी नोकरीबाबत संपर्क केला असता त्याने 'तुम्ही ऍप्लीकेबल नसून तुमची कागदपत्रे कमी असल्याचे सांगितले. गौरव व प्रवीण राडे यांना नोकरीबाबत वारंवार फोन केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. त्यानंतर पोलिस ठाण्यात येऊन दोघांविरोधात फिर्याद दिली.