Latest

Wild Animals In Maharashtra : महाराष्ट्राच्या ५७ अभयारण्यांत आढळले २५ दुर्मीळ जातींचे प्राणी

अमृता चौगुले

ठाणे; शशी सावंत : महाराष्ट्रातील 57 अभयारण्यांमध्ये पट्टेरी वाघांसह 25 जातींचे दुर्मीळ प्राणी आणि 107 जातींचे पक्षी अधिवास करून राहत असल्याचे प्राणी-पक्षी गणनेतून पुढे आले आहे. बुद्ध पौर्णिमेला सुरू झालेली प्राणी पक्षी गणना चार दिवस सुरू होती. यामध्ये आढळलेल्या एकूण प्राण्यांची संख्या 6 हजार पेक्षा जास्त आहे. यामध्ये दुर्मीळ प्राण्यांमध्ये तरस, सांबर, चौशिंगा, चितळ, रानमांजर, खवले मांजर, उदमांजर, लंगूर माकड, हत्ती, बिबटे, ब्लॅक पँथर अशा दुर्मीळ प्राण्यांचे दर्शन झाले. (Wild Animals In Maharashtra)

ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 3 हजार 800 प्राणी नोंदवले गेले. यामध्ये पट्टेरी वाघ 33, बिबटे 16, चितळ 1212, निलगाय 54, अस्वल 12, सांबर 300, चौशिंगा 1, मोर 158, सायाळ 6, गवे 200, रानडुक्कर 383, अस्वल 25, रान मांजर 9 असे दुर्मीळ प्राणी सापडले. अकोला येथील अभयारण्यात 80 चितळ, निलगाई 64, किंकारा 10, रानडुक्कर 66, माकड 38, मोर 28 अशा प्राण्यांची नोंद झाली. (Wild Animals In Maharashtra)

संग्रामपूरच्या अंबाबर अभयारण्यात 3 पट्टेरी वाघ, 3 बिबटे, 12 अस्वले, निलगाय 54, सांबर 37, भेडकी 15, गवे 64, रानडुक्कर 48, वानर माकड 51, माकड 116, रानकोंबडी 20, मोर 85, सायाळ 1 अशा पक्षीप्राण्यांची नोंद झाली. (Wild Animals In Maharashtra)

पुण्याच्या सह्याद्री पट्ट्यात 22 प्राण्यांच्या प्रजाती सापडल्या. यामध्ये किंकारा 107, लांडगे 4, टिटवी 7, तरस 3, रानडुक्कर 47, भेकर 30, हरीण 5, सांबर 12 आणि 10 मोर अशी प्राणीसंपदा सापडली. (Wild Animals In Maharashtra)

मुंबईसारख्या महानगरातील संजय गांधी अभयारण्यात प्राण्यांची संपदा उत्तम असल्याचे दिसून आले. चितळ 82, सांबर 24, वानर 42, माकड 44, घुबड 24, बदक 11, बिबटे 4 सापडले आहेत. तर तुंगारेश्वर अभयारण्यात 67 चितळ, 3 बिबटे, 6 सांबर, 11 लंगूर सापडले आहेत. रायगड जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण म्हणून ओळख असलेल्या फणसाड अभयारण्यामध्ये 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी आणि 164 प्रकारचे पक्षी, 27 प्रकारचे साप आढळून आले आहेत. प्रामुख्याने रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, तरस, खवले मांजर, रानमांजर, बिबटे अशा जातीचे एकूण 150 पेक्षा जास्त प्राण्यांची नोंद झाली आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात 112 प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. गिधाडे, दयाळ, बहिरा, शहाबाज, ससाणा, भारद्वाज, बुलबुल, मोर, टिटवी, तितर, गरुड, पोपट, सुतार पक्षी, कोतवाल, बगळे, घारी यांसह विविध पक्षी प्राण्यांची नोंद इथे आढळली. एकूण विविध जातींचे 400 पक्षी इथे अधिवास करून आहेत. 12 चौ. कि.मी. अंतरात हा पक्षांचा अधिवास आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखले जाणारे गवा अभयारण्यामध्ये गव्यांचा कळपच्या कळप हमखास आढळतात. त्याचबरोबर हरीण, सांबर, चितळ यांचे कळप दिसतात. वाघाचे ठसे ही दिसतात. या अभयारण्यात साळींदर, अस्वले, साप, नाग यांची ही रेलचेल सुरूच असते. महाराष्ट्र राज्याच्या जंगल खात्याने याकडे खास लक्ष देऊन या अभयारण्याची चांगली जोपासना केली आहे. त्याबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दाजीपुरचे पर्यटन विकास केंद्र म्हणुन लक्ष केंद्रित केले आहे. येथील युवक गृहाचे जंगल निवास म्हणून रूपांतर केले आहे.

विदर्भातील अंबाबरवा अभयारण्यात कोकीळ, खाटिक, सुतार, लिटपुरी, माशीमार, निलांग, राखी, पिवळा- लाल माशीमार, पांढरपोट्या, कोतवाल, चिमणमार, ससाणा, पोपट, तांबट, पिंगळा, रानखाटिक, रानकोंबडी, कवडी, रामगंगा, बलबुली, कपाशी घार, शुभग, शकीरा, तुरेवाला आणि इगल अशा पक्षांची नोंद झाली. प्राण्यांमध्ये भेडकी 40, चितळ 1292, सांबर 299, चौशिंगा 1, निलगाय 46, रानगवा 223, वानर 401, रानकुत्रे 50, अस्वल 25, जव्हादी मांजर 6, उद मांजर 4, बिबटे 16, वाघ 23 अशी प्राणीसंपदा आढळली.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT