करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी व नगर तालुक्यातील 23 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे पाच कोटी रूपये वीजबिल थकले. आहे. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने ही योजनाच बंद पडली आहे. त्यामुळे लाभधारक 23 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळा धरणातून मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेद्वारे नगर तालुक्यातील व पाथर्डी तालुक्यातील 23 गावांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पांढरीचा पूल या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहे. येथून पाणी फिल्टर करून ते नगर तालुक्यातील चार, तर पाथर्डी तालुक्यातील 19 गावांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे प्रत्येक गावालाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे त्यामुळे बहुतांश गावांची तहान भागवण्याचे काम मिरी -तिसगाव नळ योजनेद्वारे केले जात आहे.
संबंधित बातम्या :
सध्या 14 ते 15 गावे या योजनेचे पाणी घेत आहेत. परंतु, ज्या गावांना मिरी-तिसगाव नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, त्यापैकी अनेक गावे या योजनेचे पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या योजनेच्या वीज बिलाचा आकडा वाढला आहे. सुमारे पाच कोटींचे वीज बिल थकल्याने महावितरणने आठ दिवसापासून योजनेचा वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे लाभधारक गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे अनेक लाभधारक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, मिरी-तिसगाव नळ योजना वीज कनेक्शन जोडून पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी लाभधारक गावांमधून केली जात आहे.
पाणीपट्टी नियमित भरावी : सावंत
या योजनेचे दर महिन्याला चार-साडेचार लाख रूपये बिल येते. दरमहा बिल भरण्याचे आवाहन महावितरणने केलेले आहे. बिल भरण्यास विलंब झाल्याने आठ दिवसांपासून योजनेचा वीजपुरवठा बंद केला आहे. प्रत्येक लाभधारक गावाने पाणीपट्टी नियमित भरल्यास योजना बंद पडणार नाही, असे मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी सांगितले.