नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या वरिष्ठ सभागृहातील खासदारांना केंद्र सरकारकडून वेतनासह विविध भत्ते आणि सुविधा पुरवल्या जातात. या सुविधांच्या पूर्ततेसाठी गेल्या दोन वर्षांत तब्बल २०० कोटींचा खर्च करण्यात आला. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या खासदारांच्या प्रवासावरच जवळपास ६३ कोटींचा खर्च करण्यात आला.
२०२१-२२ दरम्यान कोरोना महामारीनंतर सरकारी तिजोरीतून राज्यसभा खासदारांवर ९७ कोटी रुपयांहून अधिकचा निधी खर्च करण्यात आल्या.या एकूण खर्चांमध्ये या खासदारांच्या देशांतर्गत प्रवासावर २८.५ कोटी आणि आंतरराष्ट्रीय यात्रेवर १.२८ कोटी प्रवास खर्चाचा समावेश आहे. तर, वेतनावर निव्वळ ५७.६ कोटी, वैद्यकीय बिलांपोटी १७ लाख आणि कार्यालयीन भत्त्यासाठी ७.५ कोटी खर्चिले गेले. खासदारांना सूचना तंत्रज्ञानासंबंधी सुविधेसाठी १.२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या आरटीआयच्या उत्तरानुसार २०२२-२३ दरम्यान एकूण १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. या खर्चात देशांतर्गत आणि विदेशी यात्रेवार ३३ कोटींचा समावेश होता. याकाळात सदस्यांच्या वेतनावर ५८.५ कोटी, वैद्यकीय सुविधेसाठी ६५ लाख, कार्यालयीन खर्चासाठी ७ कोटी आणि आयटी सेवांसाठी १.५ कोटी रुपयांचा यात समावेश आहे.राज्यसभेच्या माजी खासदारांना देशांतर्गत प्रवासाच्या सुविधेवर २०२१-२२ दरम्यान १.७ कोटी आणि २०२२-२३ मध्ये ७० लाख खर्च करण्यात आल्याची माहिती सचिवालयाकडून देण्यात आली आहे.