aditya thakare 
Latest

डोंबिवलीतून १५६ कारखाने स्थलांतरीत करणार, मात्र कामगारांना बेरोजगार होऊ देणार नाही : आदित्य ठाकरे

backup backup

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : विकासासाठी आमचा प्रत्येक श्वास असला तरी पर्यावरण देखील सांभाळले गेले पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून १५६ कारखाने डोंबिवलीतून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारे कामगार बेरोजगार होणार नाहीत. यासाठी काही नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

डोंबिवली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन सोहळा गुरुवारी सायंकाळी पार पडला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार राजू पाटील ,मान्यवर उपस्थित होते. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृहाचे नूतनीकरण , दुर्गाडी येथील नदीचे सुशोभीकरण शुभारंभ ,नौदल संग्रहालय विकसित करणे, पक्ष प्रवेश आदी विविध कार्यक्रम पार पडले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी औद्योगिक शहर वाढत असताना फंड किती उपलब्ध होतो हे महत्त्वाचे आहे असे सांगताना एमएमआरडीए, एमएसआयडी भागासाठी इतिहासात निधी आणू शकलो नाही. मात्र आता महविकास आघाडीची सत्ता आहे असा टोला देखील लगावला. मुंबई माझी आई असली तर डोंबिवली माझी मावशी आहे असे सांगत आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीत आल्यानंतर शिवसेनेच्या कामाची आठवण येते असे नमूद केले .कल्याण डोंबिवलीत पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाचा धडाका लावला आहे. २०२४ नंतर दिल्लीतून सुद्धा फंड आणु शकतो असे सांगत दिल्लीतील सत्तापालट संदर्भात वक्तव्य केले.

राजकीय श्रेय किंवा वाद विवाद भांडण न करता विकास कामांकडे अधिक जोर द्यावा अशी शिकवण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्याचे सांगितले. फूटपाथ , गटारे, झाडे लावणे इत्यादी मूलभूत सुविधांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मुंबईतील महापालिका शाळांमध्ये जशा सीबीएससी शाळा सुरू झाल्या त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीत पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएससी सुरू व्हाव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले. तरुण तरुणी महिला या समाजातील प्रत्येक घटकाला काम मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्ष मुख्यमंत्री टॉप ५ च्या यादीमध्ये आहेत. टीम वर्क महत्त्वाचे असून जागतिक आरोग्य संघटनेने देखील महाराष्ट्राला कोवीड काळात केलेल्या कामगिरीचे श्रेय दिले आहे असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास करायचा असून कमीतकमी राजकारण करायचे आहे असे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खूप प्रगती केल्याने कौतुक वाटते असे सांगत खासदारांना शाबासकी दिली. ठाणे जिल्ह्यात देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने अभिमान वाटतो असे सांगताना पालकमंत्र्यांनी आमदार राजू पाटील यांना लोकांच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून कामे करूया असे सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आम्ही केवळ निवेदन देऊन थांबत नाही तर निधी घेऊन येतो आणि कामाला सुरुवात करतो असा टोला आमदार राजू पाटील यांना लगावला.

भाजप आणि काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांनी शिवसेनेते प्रवेश केला. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जो विश्वास ठेवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही असे सांगितले. पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे,यांच्या उपस्थितीत भाजपाचे माजी नगरसेवक रणजित जोशी, वृषाली रणजित जोशी,नितीन पाटील, रंजना नितीन पाटील ,आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT