पुणे : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या (पीए) नावाने तब्बल 10 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारच्या दोघांवर बंडगार्डन पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
प्रविण विठ्ठल जगताप (रा.वाई, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या अन्य एका साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश विश्वास पटवर्धन (42,राजयोग सोसायटी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.
दाखल गुन्ह्यानुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो, माझी मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे स्वत:ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी ओळख असल्याचे सांगणारा आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन याला सांगितले. त्या बरोबरच भूषण गगराणी यांचे पीए हेमंत केसळकर यांच्याशीही ओळख असल्याचे त्याने पटवर्धन यांना सांगितले.
त्यावर महेश पटवर्धन यानी विश्वास ठेवला. त्यानंतर त्यानी आरोपीला १० लाख रुपये दिले. पण तो काही काम करत नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर आरोपी प्रवीण जगताप याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे.