

हैदराबाद; वृत्तसंस्था : कोरोनाच्या काळात ज्या रुग्णांवर रेमडेसिवीरचा वापर करण्यात आला त्या रुग्णांना हृदयाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लो ब्लडप्रेशर, हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयाच्या झडपेचे काम मंदावणे आदी समस्या दिसून येत आहेत.
हैदराबादच्या उस्मानिया मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. कोरोनाच्या काळात 94 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांवर सर्रास रेमडेसिवीरचा वापर करण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या श्वसन यंत्रणेतील इन्फेक्शन कमी होण्यास मदत झाली; पण आता या रुग्णांना हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे. या संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधीच हृदयविकार आहे आणि बिटा ब्लॉकर्स वापरतात त्यांना हा त्रास अधिक आहे. त्यानुसार हृदयाच्या ठोक्यांची संख्या कमी होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, अचानक रक्तदाब कमी होणे, हृदयाची झडप विलंबाने काम करणे आदी नवीन समस्या उद्भवत आहेत.
हृदयाची गती कमी होण्यामुळे चक्कर येणे, थकवा, दगदगीनंतर धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छाती गच्च आवळल्यासारखी वाटणे, गुदमरल्यासारखे वाटणे, भोवळ येणे, स्नायू ताठरणे, सांधेदुखी आणि हृदय बंद झाल्यासारखे वाटणे आदी त्रास उद्भवत आहेत. ज्या रुग्णांचा संशोधकांनी अभ्यास केला त्यातील बहुतेकांना रेमडेसिवीर औषधामुळे आता हृदयाचे ठोके कमी झाल्याचा त्रास आहे. यातील बहुतांश रुग्ण 65 वर्षांच्या पुढील आहेत.
याच विषयावर जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल जारी केला असून, त्यात रेमडेसिवीर दिलेल्या 2,603 रुग्णांना ब्रॅडिकार्डिया अर्थात हृदयाचे ठोके कमी होण्याचा त्रास झाल्याचा तपशील आहे.