#NobelPrize : ॲलेन ॲस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर!
पुढारी ऑनलाईन डेस्क : नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा सुरू झाली आहे. आज (दि. 4) स्टॉकहोममधील रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल (Nobel Prize for Physics) पारितोषिकाची घोषणा करण्यात आली. भौतिकशास्त्रातील नोबेल अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर या शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्स आणि फोटॉनवरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
स्वीडनच्या स्वंते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
काल (दि. 3) सोमवारी स्वीडनच्या स्वंते पाबो यांना (Nobel Prize 2022) वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (Physiology or Medicine Nobel Prize) जाहीर करण्यात आले होते. स्वंते पाबो यांना विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. पाबो हे पॅलेओजेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत, ज्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथे मेंजेनेटिक्स विभागाचे संचालकही राहिले आहेत.पाबो एक आनुवंशिकशास्त्रज्ञ आहे, जे उत्क्रांतीविषयक अनुवांशिक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर बरेच काम केले.
दरम्यान, उद्या (दि.5) बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी (दि.6) साहित्यातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. नोबेल शांतता पुरस्काराबाबत बोलायचे झाले तर त्याची घोषणा शुक्रवारी (दि.7) होणार असून अर्थशास्त्रातील नोबेल 10 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
गेल्या वर्षी 2021 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना देणा-या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

