

पुढारी ऑनलाईन डेस्क : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं नुकतंच निधन झालं. पुण्यातील खासगी रुग्णालयात कर्करोगाशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जगताप यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या दरम्यान अजितदादांनी जगताप यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
या दरम्यान दादांच्या एका सल्ल्याने लक्ष्मण जगताप यांचं राजकीय करियर बदललं होतं. याबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, '२००४ च्या विधानपरिषद निवडणुकीवेळी मी त्याला अपक्ष उभं राहण्याचा सल्ला दिला होता. खरंतर त्यावेळी प्रचंड दबाव होता. पण मी त्याला मोबाइल फोन बंदच ठेवण्याचा सल्ला दिला होता. समोर त्यावेळी कॉँग्रेसचा उमेदवार उभा होता. पण मी त्यांना उभं केलं आणि निवडून आले.' यानंतर अजित पवार यांनी जगताप यांच्या कुटुंबातील प्रत्येकाची भेट घेतली. आस्थेने प्रत्येकाची विचारपूस केली.
जगताप यांनी कॉँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तर १९९८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. निधनापूर्वी ते भाजपाकडून विधानसभेत निवडून गेले होते. ते आजारी असतानाही पक्षाला ज्यावेळी गरज होती तेव्हा व्हीलचेअरमध्ये बसून मतदानाला गेले होते. त्यावेळी त्यांच्या इच्छाशक्तिचं कौतुक झालं होतं.