

पुणे, पुढारी ऑनलाईन : "लोकांनी विश्वासाने केंद्रात भाजपला निवडून दिले आहे. सामान्यांना पेट्रोल, डिझेल, सिलेंडर वाढले की महागाई वाढते. अगोदरच कोरोनाच्या अडचणी आहेत, अशात केंद्राने दरांबाबत धोरण आखणे महत्वाचे होते. याबाबत लोकशाही मार्गाने सर्व आंदोलने करूनही त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही. हे देशाचे दुर्दैव आहे", अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेतेत ते बोलत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, "पहिल्या लाटेत अडचणी आल्या. पण दुसऱ्या लाटेत अडचणी दूर करून परिचारिका डॉक्टरांनी दुरुस्त करून स्थानिक स्वराज्य संस्था, एनजीओ, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार, खासगी हॉस्पिटल यांच्या मदतीने बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड याचे नियोजन करण्यात आले आहे."
"कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना प्रादुर्भाव होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्याबाबत पूर्णत नियोजन करण्यात आला आहे. निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जम्बो हॉस्पिटल दोन ठिकाणी आहे. हे आहे त्या परिस्थितीच उभी आहेत. ते बंद केल्यास पुन्हा खर्च होईल म्हणून ते आहे त्या परिस्थितीत उपलब्ध आहे. दोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत", अशीही माहिती पवार यांनी दिली.
… म्हणून धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत
मागणी अनेकांची असू शकते. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. जिथे श्रद्धा असते तेथे लोकांना जाता आले पाहिजे. परंतु, या नावाने गर्दी होऊन प्रादुर्भाव वाढणार असल्यास नियोजन कोलमडेल. संकट ओढावू नये म्हणून केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना सर्व माहिती आहे. मनसेचा संबंध येत नाही. धार्मिक स्थळे सुरू करण्याची आमची मनाची तयारी आहे. परंतु, लोकांच्या जीवाला प्रथम प्राधान्य देणे महत्वाचे आहे. म्हणून महाविकास आघाडीने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात मानाच्या गणपतींनी सहमती दर्शवली
अजित पवार म्हणाले की, "कोरोनाच्या नवीन निर्बंधाबाबत चर्चा झाली आहे. परंतु, सध्यातरी कुठले निर्बंध लादण्याबाबत विचार नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या पाचही गणपती मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव करण्याबाबत सहमती दर्शवली आहे", अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पहा व्हिडीओ : पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काढलेल्या पदयात्रेबाबत राजू शेट्टी सांगतात