

पुणे, पुढारी वृत्तसेवा: परतीचा पाऊस माघारी गेल्यानंतर आल्हाददायक थंडीची चाहूल लागली. मात्र, वाहनांचा धूर आणि दिवाळीमुळे केलेली फटाक्यांची आतषबाजी यामुळे विविध शहरांच्या हवेची गुणवत्ता बिघडली आहे. 'सफर'च्या नोंदींनुसार मुंबईची हवा वाईट पातळीवर, तर पुण्याची हवा समाधानकारक पातळीवर असल्याचे दिसून येत आहे; तर दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे.
सफर या संस्थेकडून देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येते. पावसामुळे हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कण जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र, पावसाळा संपल्यानंतर गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, दिवाळीमुळे करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही वातावरण धूरग्रस्त झाले आहे. सफरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) 50 पर्यंत एक्यूआय असलेली हवा चांगली, 100 ते 200 एक्यूआयदरम्यानची हवा समाधानकारक, 200 ते 300 एक्यूआयदरम्यानची हवा वाईट, 300 ते 400 एक्यूआयदरम्यानची हवा अत्यंत वाईट आणि 400 एक्यूआयवरील हवा गंभीर मानली जाते.
सफरच्या नोंदींनुसार सोमवार-मंगळवारी मुंबईची हवा वाईट पातळीवर, तर पुण्याची हवा वाईट ते मध्यम पातळीवर असल्याचे दिसून आले. हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर असताना श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, असे प्रकार होऊ शकतात. तर, वाईट पातळीवर असताना जास्त काळ घराबाहेर राहणे अपायकारक ठरू शकते.
गेल्या आठवड्यात मुंबई, पुणे, दिल्ली आणि अहमदाबाद या चार शहरांच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर होती. मात्र, एकाच आठवड्यात हवेच्या गुणवत्तेत बदल झाल्याचे दिसून येत आहे. येत्या दोन दिवसांत पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारण्याची, तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट पातळीवरच राहण्याचा अंदाज 'सफर'कडून वर्तवण्यात आला आहे. तर, देशातील सर्वांत प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. पुढील दोन दिवस दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीरच राहण्याचा अंदाज 'सफर'ने व्यक्त केला आहे.