सातारा : पिवळ्या वादळामुळे महामार्ग ब्लॉक

सातारा : पिवळ्या वादळामुळे महामार्ग ब्लॉक
Published on
Updated on

खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र झाले आहे. गणेश केसकर यांच्या उपोषणाच्या 16 व्या दिवशी धनगर समाज बांधवांनी शुक्रवारी दुपारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट अडवून धरला. समाजबांधव घोडे, मेंढ्यांसह रस्त्यावर उतरल्यामुळे तब्बल पाच तास वाहतूक पूर्णपणे बंद होती. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला 10 कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. महामार्गावर पिवळे वादळ उसळल्याचे दिसून आले.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, राज्यपालांनी धनगड व धनगर हे एकच असल्याची शिफारस द्यावी, या मागण्यांसाठी समाजातील युवक गणेश केसकर हे 16 दिवसांपासून लोणंदमध्ये बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या 16 व्या दिवशी शुक्रवारी धनगर समाजाच्यावतीने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात रास्ता रोको केला. खंडाळ्यातील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. तेथून महामार्गावर आंदोलक समाजबांधवांचा लोंढाच उसळला. आंदोलनकर्त्यांनी 'येळकोट येळकोट जय मल्हार', 'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं' अशा गगनभेदी घोषणा देत महामार्गावर ठिय्या मांडला.

खंबाटकी घाटात रास्ता रोको केल्यामुळे पुणे व सातारा बाजूकडे 10 किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे पाण्यावाचून हाल झाले. वाहतूक कोंडी होवू लागल्याने पुण्याकडून सातार्‍याकडे जाणारी वाहतूक पंढरपूर फाट्यावरून लोणंदमार्गे वळवण्यात आली. महामार्गावर आल्यानंतर आ. गोपीचंद पडळकर व समाजबांधवांनी आपली भूमिका मांडत सरकार विरोधातील रोष व्यक्त केला. तसेच लवकरात लवकर समाजाला एस.टी मधून आरक्षण देण्याची मागणी केली.

धनगर समाजातील नागरिक हे घोडे व मेंढ्या घेवूनच रस्त्यावर उतरल्याने सातारा-पुणे महामार्ग एकदम थबकला. नागरिकांनी पूर्ण घाटच रोखल्याने वाहने जागीच थांबली. त्यामुळे हळू हळू दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी होवू लागली. यावेळी प्रशासनातील अधिकार्‍यांनी व पोलिसांनी आंदोलकांची भेट घेवून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी सरकारचा प्रतिनिधी आल्याशिवाय न उठण्याची भूमिका घेतली.

आंदोलन युवक व पोलिसांच्या मध्ये वाहने सुरू करण्यावरून हमरी तुमरी झाली. पोलीस प्रशासन वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते तर आंदोलन मात्र वाहनांना जागचे हलू देत नव्हते. यावेळी पोलीस व युवकांमध्ये जोरदार बाचाबाची होत होती. अनेक लोकांनी रस्त्यावर झाडाच्या फांद्या आणून टाकून रस्ता थांबवण्याचा प्रयत्न केला .

अखेर जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडावे, अशी विनंती करत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला. तसेच उपोषणकर्ते गणेश केसकर यांची मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतरच महामार्ग खुला झाला.

महिलांचाही लक्षणीय सहभाग

धनगर समाजाच्या आंदोलनात पहिल्या दिवसांपासून महिलांचा सहभाग दिसून आला आहे. यापूर्वीही झालेला रास्ता रोको व उपोषणस्थळी महिलांची गर्दी दिसून आली. शुक्रवारी झालेल्या रास्ता रोकोमध्येही महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी काही महिलांनी आपली मते मांडत सरकारने आरक्षण देण्याची मागणी केली. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभाग घेतल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news