

इंदापूर : सरडेवाडी टोल नाक्यासंदर्भात असलेल्या विविध मागण्या व इतर रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांसह सरडेवाडी टोल नाक्यावर सोमवारी 20 जून रोजी टोल वसुली बंद आंदोलन केले.
यावेळी सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर, कर्मयोगीचे संचालक रवींद्र सरडे, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे, उपसरपंच सतिश चित्राव, माजी उपसरपंच हनुमंत जमदाडे, विजय शिद, ग्रामपंचायत सदस्य आप्पा माने, गोकुळ कोकरे, नामदेव तोबरे, बळीराम जानकर, प्रशांत सरडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारी १३ जून रोजी सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर यांच्या स्वाक्षरीने सरडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाहन मालकांच्या मागण्यांसंदर्भात या टोल प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनामध्ये त्यांनी आपल्या मागण्या व्यक्त केल्या होत्या. मात्र सरडेवाडी टोल प्रशासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने वाहन मालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
न्याय व हक्कासाठी टोल बंद आंदोलनात पाच ते दहा वर्षांची शाळकरी मुले सहभागी झाली होती. स्थानिकांच्या भडकलेल्या भावना पाहता आंदोलन अधिक चिघळू नये, यासाठी इंदापूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी मध्यस्थी केली. टोल प्रशासनाकडून आठ दिवसात मागण्यांसदर्भात बैठक लावली जाईल आणि त्यातून मार्ग काढला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सरडेवाडी गावातील वाहन टोल फ्री करावी, गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लोखंडी उड्डाणपूलाची तात्काळ निर्मिती करावी, टोल नाका परिसरात पुणे-सोलापूर लेन लगत सेवा रस्ता निर्माण करावा, सेवा रस्ता संरक्षक भिंत उभारावी यांसह इतर मागण्या आहेत.