

महेंद्र कांबळे
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणविणार्या पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या व हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच माणुसकीला काळिमा फासणार्या तसेच क्रूरतेचा कळस गाठणार्या घटना समोर आल्या आहेत. शहरात सव्वादोन वर्षांत विवाहितेच्या छळाचे तब्बल 956 गुन्हे दाखल झाले. काही घटनांमध्ये अघोरी विद्या अन् जादूटोण्याचा वापर करून विवाहितेचा छळ केला गेल्याचे धक्कादायक प्रकारही घडले आहेत.
घटना 1 : पत्नीला हाडांची भुकटी खाण्यास भाग पाडले
मूलबाळ होत नसल्याने आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी इंजिनिअर पत्नीला स्मशानातील राख पाण्यातून पिण्यासाठी देण्याबरोबरच, पिस्तुलाच्या धाकाने मृतांच्या हाडांची भुकटी खाण्यास भाग पाडून अघोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार धायरी भागात नुकताच घडला होता. याप्रकरणात सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला.
घटना 2 : विवाहितेचे मासिक पाळीचे रक्त विकले
पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तर विवाहितेच्या मासिक पाळीचे रक्त मांत्रिकाला 50 हजार रुपयांसाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये नुकताच पती, सासू सासरे, मंत्रिकासह नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना 3: सिगारेटचे चटके, छळ
ज्योतिषीच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथा आणि जादुटोण्याचा वापर करून तिला सिगारेटचे चटके देऊन तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानंतर उद्योजक कुटुंबावर गुन्हा दाखल केला होता. पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादी महिलेने काही महिन्यांपूर्वी केला होता.
वर्ष : विवाहितेला छळाचे दाखल गुन्हे
2021 : 327
2022 : 485
2023 : 134
(मार्च अखेर)
कामावरून टोमणे-मारहाण, चारित्र्यावर संशय, माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव, अनैसर्गिक अत्याचार त्याचबरोबर आता जादू टोण्यासारख्या अघोरी प्रथांचादेखील अशा गुन्ह्यांत वापर केला जात आहे. अशा गुन्ह्यांतील सहभागी आरोपींना शिक्षा होण्यासाठी योग्य तपास होऊन तपासाची साखळी जोडून खटल्यात साक्षीदार फितुरी करणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.
– वामन कोळी, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, पुणे.