

बंगळूर; वृत्तसंस्था : दुकानात नवी चॉकलेट आले. मुलांनी एकदा खाऊन पाहिले. नंतर या चॉकलेटची चटकच लागली. मुले आपापल्या आई-बाबांकडे त्याच चॉकलेटसाठी हट्ट धरू लागली. हट्ट पुरविला नाही तर टाहो फोडू लागली. अखेर संशय आला… आणि… काही पालकांनी चॉकलेट खाऊन पाहिले. चॉकलेट खाताच नशा चढत असल्याचे पालकांना जाणवले. पालकांनी पोलिसांना कळविले.
कर्नाटकच्या मंगळूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. पैसे कमाविण्याच्या नादात नशेच्या सौदागरांनी निष्पाप मुलांनाही सोडलेले नव्हते. चटक लागावी म्हणून चॉकलेटमध्ये भांग मिसळलेली होती.
भांगयुक्त चॉकलेट उत्तर प्रदेशात तयार होत असल्याचे तपासाअंती समोर आले आहे. येथील 2 दुकानदारांनी ते विक्रीला ठेवले होते. पोलिसांनी छापा टाकून 125 किलो चॉकलेटस् जप्त केले आहेत. मंगळूरनंतर रायचूरमध्येही या चॉकलेटचा साठा जप्त करण्यात आला.
आंतरराज्यीय टोळी कशाप्रकारे गांजा, भांगयुक्त चॉकलेटचा पुरवठा करते. टोळीत व टोळीमागे नेमके कोण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. पहिल्यांदाच असा प्रकार समोर आला असून, तो लहान मुलांशी संबंधित असल्याने गंभीरपणे या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आम्ही कुणालाही सोडणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.