पतीच्या निधनानंतर लेकीसाठी ‘ती’ लढली ‘पुरुष’ होऊन; पुरूषप्रधान व्यवस्‍थेशी ३६ वर्षांचा संघर्ष, नावही बदलले

पतीच्या निधनानंतर लेकीसाठी ‘ती’ लढली ‘पुरुष’ होऊन; पुरूषप्रधान व्यवस्‍थेशी ३६ वर्षांचा संघर्ष, नावही बदलले

Published on

चेन्‍नई ; वृत्तसंस्था : तामिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यातील 57 वर्षांची एक महिला गेल्या 36 वर्षांपासून पुरुष म्हणून जगते आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत लेकीला एकट्याने वाढविण्यासाठी तिला हे करावे लागले.

एस. पेचियाम्मल हे तिचे मूळचे नाव. लग्‍नानंतर 15 दिवसांतच तिच्या पतीचे निधन झाले. तेव्हा पेचियाम्मल 20 वर्षांची होती. ती गर्भवती होती आणि तिला दुसरे लग्‍न करायचे नव्हते. तिला मुलगी झाली. पेचियाम्मलने बांधकामावर, हॉटेलमध्ये मजूर म्हणून काम करून पाहिले. सर्वच ठिकाणी तिला महिला म्हणून समस्यांचा सामना करावा लागला. प्रत्येक ठिकाणी पती हयात नाही हे कळले की, कुणीतरी तिचा माग काढत असे. मग तिने ठरविले की, पुरुष म्हणून जगायचे.

तिरुचेंदुर मुरुगन मंदिरात जाऊन तिने केशदान केले. साडीऐवजी शर्ट आणि लुंगी घालायला सुरुवात केली. पेचियाम्मलने स्वत:चे नावही बदलून 'मुथू' असे पुरुषी केले.

नाव आणि रूप बदलल्यानंतर 20 वर्षांपूर्वी ती मुलीसह कटुनायक्‍कनपट्टी गावात राहू लागली. मुथू बाई आहे, हे फक्‍त मुलीला आणि अगदी जवळच्या नातेवाईकांना माहिती होते. बघता बघता 30 वर्षे उलटली. यादरम्यान मुथूने जेथेही काम केले, तेथे त्यांना 'अन्‍नाची' (पुरुषांसाठी वापरले जाणारे संबोधन) नावाने हाक मारली जात असे. ज्या मुलीसाठी हे सगळे दिव्य पचियाम्मलने केले, ती शण्मुगासुंदरी ही लेक आता सासरी गुण्यागोविंदाने नांदते आहे, हे एकमेव समाधान पचियाम्मल अम्माला आहे. वयोमानाने पचियाम्मलकडून आता मजुरी होत नाही. सर्व शासकीय कागदपत्रांतून पुरुष म्हणून परिचय असल्याने त्या विधवा म्हणून काही लाभही शासनाकडून मिळवू शकत नाहीत.

मुथू म्हणूनच येवो मृत्यू!

एका मुलाखतीत पेचियाम्मल यांनी सांगितले, रंगकाम, चहा-पराठे तयार करणे अशी मिळतील ती, पडेल ती मेहनतीची कामे केली. पै-पै जोडून लेकीच्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. मुथू हीच माझी आता ओळख आहे. आधार, मतदार ओळखपत्र, बँकेच्या खात्यावरही माझे हेच नाव आहे. मुथू म्हणूनच मी जगले आणि मुथू म्हणूनच आता मरायचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news