गुड न्यूज ! 40 दिवसांनंतर पुणेकरांनी घेतली शुद्ध हवा !

air pollution
air pollution
Published on
Updated on

पुणे :

  • वायुप्रदूषणामुळे 47 टक्क्यांनी वाढले अकाली मृत्यूंचे प्रमाण
  • शहराची प्रगती झाली, पण विविध आजार वाढले
  • वाहतूक कोंडीत आपण
  • एक तास अडकलो, तर वाढतो अनेक आजारांचा धोका

रविवारी पुणेकरांसाठी आनंद वार्ता आली. हवेची गुणवत्ता 26 नोव्हेंबर रोजी म्हणजे 40 दिवसांनी चक्क समाधानकारक गटात आली. याला मात्र शिवाजीनगर, स्वारगेटची हवा अपवाद ठरली. दरम्यान, शहरात वाहतूक कोंडीत एक तास जरी अडकलो, तरी नाका-तोंडात व डोळ्यांत प्रचंड मोठ्या प्रमाणावर धुलिकण जातात अन् अनेक आजार त्यामुळे जडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. वायुप्रदूषणामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण 47 टक्क्यांनी वाढल्याचा दावा शास्त्रज्ञांनी एका शोधनिबंधात केला आहे.

देशातील दिल्ली शहर रविवारी अतिप्रदूषित होते, तर मुंबई मध्यम गटांत गेल्या दहा दिवसांपासून कायम आहे. पुणे व अहमदाबाद शहरांचे प्रदूषण मात्र तब्बल 40 दिवसांनी रविवारी अचानक समाधानकारक गटात आले. दिल्लीचा रंग गडद तपकिरी (अतिप्रदूषित गट), मुंबईचा रंग पिवळा (मध्यम गट), तर पुणे व अहमदाबाद शहराचा रंग हिरवा (शुद्ध गट) असा सफर या संस्थेच्या संकेतस्थळावर दिसला. शहरातील स्वारगेट व शिवाजीनगर वगळता शहराच्या हवेची सरासरी गुणवत्ता 56 ते 86 मायक्रो ग्रॅम पर क्युबिक मीटर इतकी नोंदवली गेली.

जेथे अतिसूक्ष्म धुलिकणांचा प्रभाव तेथे धोका
भारतातील ज्या शहरांत पीएम-2.5 या अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण जास्त आहे. तेथे अकाली मृत्युदर वाढल्याचे संशोधनात स्पष्ट केले आहे. ज्या शहरांतील हवेची गुणवत्ता सरासरी 160 ते 194 वर गेली आहे. अशा शहरांत हे प्रमाण वाढले आहे. जागतिक एक्सपोजर मृत्युदर मॉडेलचा वापर करून भारतात एकूण 2.5 या अतिसूक्ष्म धुलिकणांमुळे पाच वर्षांत 80 हजार 447 मृत्यू झाले असल्याचा दावा संशोधनात केला आहे. आकस्मिक मृत्यूंमध्ये हे प्रमाण 47 टक्क्यांवर गणले गेले आहे. त्यानंतर क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (17%), स्ट्रोक (14.7%), लोअर रेस्पीरेटरी इन्फेक्शन (9.9%) आणि फुप्फुसाचा कर्करोग (1.9%) असे प्रमाण आहे.

अकाली मृत्यूचे कारण हवा प्रदूषण
भारतातील 22 प्रदूषित शहरात पुणे शहराचाही क्रमांक लागतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या भारताच्या सर्वेक्षणात ही माहिती एका शोधनिबंधात समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते, 25 वर्षांपर्यंतच्या तरुणांचे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण जेथे वायुप्रदूषण आहे तेथे जास्त आहे. शहराचे औद्योगिकीकरण 1990 नंतर अधिक वेगाने झाले. त्यामुळे शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला. परिणामी, लोकसंख्या आणि आजूबाजूची गावे शहरात आली. शहराचा आकार फुगला. भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली; परंतु मानवी आरोग्य, पर्यावरण आणि परिसंस्था बिघडली, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी भारतातील प्रमुख प्रदूषित शहरांबाबत नोंदवला आहे. त्यात पुणे शहराचे नाव पहिल्या दहा शहरांच्या यादीत आले आहे.

हे आजार वाढत आहेत…
रक्तवाहिन्यासंबंधी आजार, हृदयरोग, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, फुप्फुसाचा कर्करोग यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात 53 टक्के मृत्यू हे जागतिकस्तरावर वायुप्रदूषण हे प्रमुख कारण बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिध्द केलेल्या 86 व्या अहवालात म्हटले आहे की, एकूण प्रदूषित शहरांपैकी भारतामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत आणि जागतिकस्तरावर वार्षिक धुलिकणांच्या वाढीत भारताचे मोठे योगदान आहे.

दिवाळीत झालेल्या प्रदूषणामुळे प्रभावित झालेल्या रुग्णांची गर्दी अजूनही आहे. बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला, श्वासाच्या तक्रारी घेऊन येणारेच आहेत. प्रदूषणामुळे एन्फ्लुएन्झाचे विषाणू अधिक वेगाने वाढतात. त्यांचा प्रभाव शहरावर अजूनही आहे. त्यामुळे व्यायाम, योग, प्राणायाम यांसह चांगला आहार घेणे व बाहेर जाताना मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळणे हे उपाय केले पाहिजेत.
                                                          -डॉ. अमित द्रविड, विषाणू आजार तज्ज्ञ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news