

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क; भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज (दि. 27) मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात प्रवेश केला. मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. यावेशी संजय राऊत यांच्यासह नाशिकमधील शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकीकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाला एकापाठोपाठ हादरे बसत असताना, ठाकरे गटाने थेट डॉ. अद्वय हिरे यांना गळाला लावले आहे. विशेष म्हणजे डॉ. हिरे यांना ठाकरे गटाने आपल्या पक्षाचे दरवाजे उघडून एका निशाण्यात दोन शिकार केल्याची चर्चा आता रंगत आहे. एक तर ठाकरे गटाने हा भाजपला मोठा धक्का दिला असून, दुसरे म्हणजे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.
यावेळी अद्वय हिरे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत मी भाजपसाठी काम केले. परंतु आता असे झाले की, हे 50 गद्दार भाजपने आपल्या मांडीवर बसवल्या पासून भाजपला आमची गरजच उरली नाही. कालपासून भाजप नेत्यांना माझी खूप आठवण येत होती. फोन येत होते. पण, सत्ता पैशांसाठी बाप बदलणारे आम्ही नाही. शिवसेना संपतेय हा गैरसमज आहे, येणा-या काळात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्याशिवाय हा कार्यकर्ता शांत बसणार नाही असेही हिरे म्हणाले. माजी आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख त्यांनी उद्धव ठाकरे यांचा केला.
आतापर्यंत अद्व हिरे शिवसेनेमुळे विधानसभेत पोहचू शकले नाही, आता शिवसेनेमुळे पोहचणार आहेत़. शिवसेनेचे महत्व, ताकद आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आजही खंभीरपणे उभे असल्याचे आजच्या प्रवेशातून सिद्ध झाले आहे. येणारे भविष्य हे शिवसेनेचे आहे. या महाराष्ट्रात शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभे राहून राज्य करेल. मी हिरे यांचे आभार मानतो, त्यांनी मनापासून शिवसेनेचे काम करण्याचे वचन दिले आहे. शिवसेना एक कुटुंब आहे. त्यात आपण प्रवेश केला आहे. तुम्हाला इथे आल्याचा पश्चाताप होणार नाही. आपल्या नेतृत्वाखाली तुम्ही शिवसेना दोन पावले पुढे घेऊन जाल असा विश्वास आहे. शिवसेना संकटात असताना आपण प्रवेश केला हे महत्वाचे असे संजय राऊत यावेळी म्हणाले.