

पणजी; पुढारी वृत्तसेवा : हिंदी चित्रपट अभिनेता अर्शद वारसी याने गोव्यातील साळगाव येथे पोर्तुगीज बनावटीचे घर खरेदी केले आहे. वारसी यांनी एका माध्यमाला बोलताना सांगितले की, मला गोवा आवडतो. त्यामुळे पूर्वी मला गोव्यात घर घ्यायची इच्छा होती. त्यावेळी उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. गोवा आणि गोव्यातील लोकांवर माझे नेहमीच प्रेम आहे.
गोव्यात घर घेण्याबाबत बोलले तर लोक घर घेण्यापेक्षा हॉटेलमध्ये राहा, असे सांगायचे, पण माझी इच्छा होती. पुढे अभिनयात करिअर केले आणि अखेर गोव्यात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मला गोव्यात एक जुने पोर्तुगीज बनावटीचे घर मिळाले आहे. ते फारच सुंदर आहे. पत्नी मारिया व मला हे घर आहे तसेच ठेवण्याची इच्छा आहे. त्यात अतिसजावट करण्यात काहीच अर्थ नाही, असे वाटते.
गोवा माझ्यासाठी नेहमीच आवडीचे ठिकाण राहिले आहे. गेल्या 35-40 वर्षांपासून मी इथे येत आहे. रेल्वे, बस, बाईक, कार अशा विविध मार्गांनी मी गोव्यात आलोय. येथे विविध बरे-वाईट अनुभव आले आहेत. नवीन वर्ष आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी आम्ही गोव्यात यायचो. येथे आम्ही विविध कार्यक्रमांमध्ये डान्स करायचो. त्यावेळी मी 16-17 वर्षांचा होतो, असे तो म्हणाला. चित्रपट क्षेत्रातील व क्रिक्रेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी गोव्यात दुसरे घर खरेदी केले आहे. काहींनी जागा घेऊन नवीन बंगले बांधले, तर काहींनी जुनी घरी विकत घेतली आहे. त्यात अर्शद वारसीची भर पडली आहे.