

दहिवडी ; पुढारी वृत्तसेवा : शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी (माण) येथे भीषण अपघात (Accident) होऊन सूर्यकांत लाला जाधव (वय 30) हा जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
शिरवळ एमआयडीसीत कामाला असलेला सूर्यकांत जाधव व महेश कट्टे हे दुचाकीवरून निघाले होते.पांगरीजवळ आल्यानंतर बिरोबा मंदिरानजिक रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीला फलटणहून येत असलेल्या ट्रकची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी फुटबॉलसारखी शंभर फुटापर्यंत ट्रकने फरपटत नेली. यामध्ये सूर्यकांत जागीच ठार झाला. तर, महेश गंभीर जखमी झाला. ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरुन पळून गेला.
अपघाताची (Accident) माहिती समजताच दहिवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे नेण्यात आले. तेथे जाधव यांना मृत घोषित केले. तर, कट्टे याला अधिक उपचारासाठी सातारला पाठविण्यात आले. तपास सपोनि संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिस करीत आहेत. सूर्यकांत जाधव यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.