

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर इगतपुरी-शिर्डी रस्त्यावर सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात श्रीरामपूर येथील दोन जण ठार झाले. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणारे श्रीकांत थोरात व वाहनचालक हर्षल भोसले अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीकांत थोरात आपल्या खासगी कामासाठी कारने (एमएच 14 ईवाय 7198) इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या दिशेने येत होते.
गरुवारी मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील गोदे शिवारात त्यांच्या कारला अपघात झाला. कारने दोन-तीन पलट्या घेतल्या आणि दुभाजकावर आदळून दोन्ही लेनच्या मधोमध पडली. या अपघातात हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच इंटरचेंज येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. कारमधील दोघांना बाहेर काढून सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळी वावी पोलिसांनी जाऊन मदत केली. दरम्यान या कारमध्ये 1 लाख 60 हजारांची रक्कम सापडली आहे. वावी पोलिसांनी ती ताब्यात घेतली असून, ती थोरात यांची की भोसले यांची होती. याबाबत खातरजमा केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देणार असल्याचे वावी पोलिस ठाण्याचे कर्मचारी शैलेश शेलार यांनी सांगितले.
या अपघातात मयत झालेले श्रीकांत थोरात हे येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी कोरोना रुग्णांची मनोभावे सेवा केली होती. त्यामुळे शहरामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच अनेकांनी केली हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे.
हेही वाचा