‘आप’ला हवा काँग्रेसच्या मदतीचा ‘हात’

‘आप’ला हवा काँग्रेसच्या मदतीचा ‘हात’
Published on
Updated on

देशभरात जिथे काँग्रेस कमकुवत झाली तिथे प्रादेशिक पक्षांनी ती पोकळी व्यापली. याउलट जिथे काँग्रेसने प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी केली तिथे तो प्रादेशिक पक्ष काँग्रेसची मते घेऊन मजबूत झाला. आतापर्यंत ज्या राज्यांत आम आदमी पक्षाची प्रगती झाली आहे आणि ती अधिक मजबूत झाली आहे, त्यात दिल्ली, पंजाब आणि गुजरात या राज्यांत आपने काँग्रेसची मते घेऊनच बस्तान बसवले; पण आता अन्य राज्यांत काँग्रेसची सरळ मते आपकडे वळतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे केजरीवाल यांना आता काँग्रेसच्या मदतीची गरज भासू लागली आहे.

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोटबांधणी आता एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी विरोधी पक्षांच्या एकजुटीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या एकीतील अडथळ्यांबाबत आणि भवितव्याबाबत जाहीरपणाने केलेले भाष्य या महाआघाडीच्या शिडातील हवा काढून घेणारे ठरले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यामधील मनोमिलन होण्यासाठी अद्याप मुहूर्त लागत नाही. समान नागरी कायद्याला तत्त्वतः पाठिंबा देण्याचा आम आदमी पक्षाचा विचार असल्याचे समोर आले आहे. केजरीवालांच्या दिल्लीतील अध्यादेशाला काँग्रेसने पाठिंबा न दर्शवल्याने आपने ही भूमिका घेतली असल्याचे दिसते. तिकडे गुजरातेत आपच्या पाच नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महाआघाडीतील या दोन प्रमुख पक्षांमधील परस्पर संघर्ष मिटण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे.

वास्तविक पाहता, केजरीवाल यांचे संपूर्ण राजकारण कोणत्या ना कोणत्या मार्गाने काँग्रेसशी जोडलेली आहे. काँग्रेस कमकुवत असेल, तर आम आदमी पक्ष भरभराट करू शकतो. दुसरी परिस्थिती अशी आहे की, काँग्रेसने मदत केली, तर आम आदमी पार्टी अधिक मजबूत होऊ शकते. इतिहासात डोकावल्यास देशातील अनेक प्रादेशिक पक्षांबाबत असेच घडत आले आहे. या दोन प्रारूपांवर राज्या- राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत झाले आहेत. जिथे काँग्रेस कमकुवत झाली तिथे प्रादेशिक पक्षांनी जागा घेतली आणि जिथे काँग्रेसने प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी केली तिथे तो प्रादेशिक पक्ष काँग्रेसची मते घेऊन मजबूत झाला. केजरीवाल यांच्या पक्षाच्या यशासाठी या दोन अटी आहेत. आतापर्यंत ज्या राज्यांमध्ये आपची प्रगती झाली आहे आणि ती अधिक मजबूत झाली आहे, तिथे काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. दिल्ली, पंजाब आणि गुजरात या तिन्ही राज्यांत आपने काँग्रेसची मते घेऊनच प्रगती केली आहे; पण आता इतर कोणत्याही राज्यात काँग्रेसची मते थेटपणाने आपकडे वळतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे केजरीवाल यांना आता काँग्रेसच्या मदतीची गरज भासू लागली आहे.

केंद्राच्या अध्यादेशाबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट न केल्यानंतरही आपने जास्त प्रमाणात नाराजी दाखवलेली नाही, हा योगायोग नाही. यावरून केजरीवाल यांच्या पक्षाची भूमिका मवाळ झाल्याचे दिसते. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींची मानहानीची याचिका फेटाळली आणि त्यांना दिलासा दिला नाही, तेव्हाही आपने राहुल यांच्या बाजूने मतप्रदर्शन केले आणि अधिकृत निवेदन काढत त्यांना पाठिंबा दिला. दुसरीकडे, आपचे निवडणूक रणनीतीकार आणि व्यवस्थापक संदीप पाठक यांनी काँग्रेसचे मोठेपण जाहीरपणाने स्वीकारले आहे. आतापर्यंत आपकडून काँग्रेसवर सातत्याने टीका केली जात होती आणि हा पक्ष संपुष्टात येत असल्याचे सांगितले जात होते; पण राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी काँग्रेसचा दर्जा खूप मोठा असून विरोधी ऐक्य निर्माण करण्यात या पक्षाला मोठी भूमिका बजावावी लागेल, असे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर विरोधी एकजुटीसाठी काँग्रेसने प्रत्येक लहान-मोठ्या पक्षाशी चर्चा करावी, असेही म्हटले आहे. याचा अर्थ काँग्रेसशी समन्वयाचा मार्ग त्यांनी बंद केलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून आप, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती यांची वेगळी आघाडी होऊ शकते, अशी चर्चा सुरू होती; पण या चारपैकी सपा आणि तृणमूल या पक्षांना काँग्रेसशी लढायचे नाही आहे. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना काँग्रेसच्या राजकारणाने काही फरक पडणार नाही; पण भारत राष्ट्र समिती आणि आपचे राजकारण पूर्णपणे काँग्रेसशी जोडलेले आहे. काँग्रेसने कठोर परिश्रम करून तेलंगणात चांगली निवडणूक लढवली, तर भारत राष्ट्र समितीचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच आपला प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या अडथळ्याचा सामना करावा लागणार आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची हवा कधीच विरून गेली आहे. त्या वादळात काँग्रेसची धूळधाण उडाली; पण गेल्या 10 वर्षांत काँग्रेसविरोधातील भ्रष्टाचाराचे कथन हरवत चालले आहे.

याउलट भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा फायदा झालेल्या भाजप आणि आप या पक्षांवर आरोप होत आहेत. आपचे मंत्री आज तुरुंगात आहेत. आपने विचारधारेऐवजी नागरिकांना मोफत वस्तू आणि सेवा देऊन आकर्षित करण्याचे राजकारण केले. काँग्रेसनेही धर्मनिरपेक्षतावादी विचारसरणीसोबतच मोफत वाटप हे निवडणूक लढवण्याचे प्रमुख हत्यार बनवले आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांची गोची झाली आहे. याउलट काँग्रेससोबत युती केली, तर साहजिकच त्यांची मते आपकडे येऊ शकतात, हे त्यांना उमगले आहे. कर्नाटकपाठोपाठ काँग्रेसविषयी अल्पसंख्याकांमध्ये आणि गरीब वर्गामध्ये जी सहानुभूती निर्माण झाली आहे, त्याचा आपल्यालाही फायदा होऊ शकतो, हे आपच्या लक्षात आले आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये आपच्या प्रचाराला अजून वेग आलेला नाही. आपने एकट्याने निवडणूक लढवली, तर कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडप्रमाणे त्यांना फटका बसणार हे उघड दिसत आहे. कारण, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे, तर तेलंगणात बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. आम आदमी पक्ष यामध्ये कुठेही नाही. केजरीवाल आणि त्यांचे निवडणूक रणनीतीकार संदीप पाठक यांना याची पूर्ण कल्पना आहे की, लोकसभा निवडणुकीपूर्वी पार पडणार्‍या या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष काहीही करू शकला नाही किंवा चमक दाखवू शकला नाही, तर लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी कोणतीही संधी उरणार नाही. त्यामुळेच काँग्रेसची मोठी भूमिका मान्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; पण काँग्रेसमधील अनेक नेते कोणत्याही स्थितीत आम आदमी पार्टीशी समन्वय साधण्याच्या बाजूने नाहीत. अशा स्थितीत केजरीवाल काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी कोणती शक्कल लढवतात, हे पाहावे लागेल.

– विश्वास सरदेशमुख, राजकीय अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news