

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. त्यांना अटक होईल या भीतीने आम आदमी पार्टीचे (आप) दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी आज ( दि. १६) सायंकाळी ५ वाजता दिल्लीतील पक्ष कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव आणि पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ही तातडीची बैठक घेण्यात येत आहे.
आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रीमो आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी सीबीआय मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्तात दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर झाले. सीबीआय मुख्यालयाबाहेर 1000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, चारपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नयेत यासाठी या भागात १४४ कलम लागू करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.