

पॅरिस : डोक्यावर हक्काचे छप्पर असावे असे स्वप्न अनेकांचे असते. मात्र कुणी आपले घर विकून अख्खे गावच विकत घेतले तर? असा प्रकार एका ब्रिटिश दांपत्याच्या बाबतीत घडला आहे. त्यांनी आपले घर विकून त्या पैशांमध्ये फ्रान्समधील एक गावच विकत घेतले!
पश्चिम इंग्लंडमध्ये राहणार्या या दांपत्याला अशी 'डील' करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांनी मँचेस्टरमधील त्यांचे तीन बेडरुमचे घर विकले आणि त्या पैशातून फ्रान्समध्ये पूर्ण गाव खरेदी केले. रेडियो इंडस्ट्रीमध्ये काम करणार्या लिज आणि डेव्हीड मर्फी यांनी आपले घर 4 कोटी 14 लाख रुपयांना विकले. तीन कोटींपेक्षा थोडी अधिक रक्कम देत त्यांनी फ्रान्समधील एक निर्जन गाव खरेदी केले. या गावातील पडकी घरे सुमारे 400 वर्षे जुनी आहेत. याठिकाणी या दांपत्याने आपल्या नातेवाईकांनाही आणले व स्वतःही आपल्या दोन मुलांसह राहण्यास आले. राहत्या घरांच्या नुतनीकरणासाठी त्यांनी काही पैसा खर्च केला.
काही घरांचा ते स्वतःसाठी वापर करणार असून अन्य घरे ते 'होलिडे होम्स' म्हणून भाड्याने देणार आहेत. यामधून त्यांना लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. आपल्या नोकरीमुळे ते मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते व त्यामुळे ते आनंदी नव्हते. आता या गावात येऊन ते आनंदी आहेत व तेथील निसर्गरम्य वातावरणात राहणे त्यांना आवडत आहे. घरांसोबतच त्यांच्याकडे बरीच मोकळी जमीन आणि स्विमिंग पूलही आहे.