कोल्हापुरात ‘द बर्निंग ट्रेन’ चा थरार
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू महाराज टर्मिनसमध्ये थांबलेल्या रेल्वे डब्याला रविवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने अवघ्या 15 मिनिटांत घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. रेल्वे पोलिस प्रशासन घडल्या प्रकाराची चौकशी करत आहे.
कोल्हापूर मधील रेल्वे स्थानकात धुराचे लोट दिसू लागले अन् पाहता पाहता आगीच्या मोठ्या ज्वालांनी आसमंत व्यापला. काही मिनिटांतच रेल्वेचा डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. स्थानक परिसरात धूर आणि आगीच्या तांडवाने स्थानकात उपस्थित रेल्वेचे कर्मचारी आणि प्रवासी हबकून गेले.
सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत रेल्वे डबा जळून खाक झाला होता. रेल्वे स्थानकावर नेहमीच्या रुळाऐवजी दुसर्या स्वतंत्र रुळावर एक जादाचा डबा (एक्स्ट्रा कोच) असतो. या डब्याला आग लागली. याठिकाणी कोणीही प्रवासी किंवा कर्मचारी नव्हते. तसेच प्रवासी वाहतूक करणार्या रेल्वेपासून हा डबा लांब अंतरावर होता. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
घटनास्थळी रेल्वेच्या अधिकार्यांसह तांत्रिक विभागाचे प्रमुख नारायण राठोड यांनी धाव घेतली. कोणीतरी बिडी-सिगारेट ओढून टाकल्याने आग लागली असावी, असा रेल्वे प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे किमान कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज राठोड यांनी व्यक्त केला.
अनर्थ टळला..!
रेल्वे डब्याने पेट घेतल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. रात्री परिसरातील तरुणांनी रेल्वे स्थानक परिसरात गर्दी केली होती. रेल्वे प्रशासन उशिरापर्यंत आगीचे कारण आणि नुकसानीची माहिती घेत होते. ही घटना रेल्वे ये-जा करते वेळी घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाला दक्षता घ्यावी लागणार आहे.

