चीनहून पाकला जाणारे आण्विक सामग्रीसज्ज जहाज मुंबईत रोखले

चीनहून पाकला जाणारे आण्विक सामग्रीसज्ज जहाज मुंबईत रोखले
Published on
Updated on

उरण/मुंबई, पुढारी वृत्तसेवा/पीटीआय : मुंबईतील न्हावाशेवा बंदरात भारतीय यंत्रणांनी चीनहून कराचीला जात असलेले एक जहाज जप्त केले आहे. जहाजाची तपासणी केली असता आण्विक क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबधित सामग्री आढळून आली. कस्टम अधिकार्‍यांच्या तपासणीनंतर 'डीआरडीओ' चमूनेही जहाजाची तपासणी केली. संशयावरून केलेल्या तपासणीनंतर आण्विक सामग्रीची खात्री पटली आणि देशाच्या आर्थिक राजधानीत एकच खळबळ उडाली.

चीनहून पाकमधील कराची बंदरासाठी रवाना होत असलेले एक जहाज संशयास्पद सामग्रीची वाहतूक करत असल्याच्या शक्यतेबाबतची गोपनीय माहिती कस्टमला मिळाली होती. संशयाच्या आधारे जहाजाची तपासणी करण्यात आली. पाकिस्तानच्या आण्विक तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात वापरात येऊ शकते, अशी सामग्री या तपासणीत आढळून आली. जहाजात कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (सीएनसी) यंत्राचीही तपासणी करण्यात आली. हे यंत्र एका इटालियन कंपनीने बनविलेले आहे. 'डीआरडीओ' (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) अधिकार्‍यांकडून खात्री पटविण्यात आली.

खेपेतील सामग्रीचा वापर पाक आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमातच करणार होता, असे 'डीआरडीओ' अधिकार्‍यांनीही सांगितले. 'सीएनसी' यंत्रणा संगणक नियंत्रित असते. क्षेपणास्त्रनिर्मितीतील महत्त्वपूर्ण घटकांना नेमकेपणा, ताकद 'सीएनसी' यंत्रणेमुळे प्राप्त होते. जप्त करण्यात आलेल्या जहाजावर माल्टाचा झेंडा असून, ते एक व्यापारी जहाज आहे. 22,180 किलो वजनाची ही सामग्री ताईयुआन मायनिंग इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट कंपनी लिमिटेडकडून पाकिस्तानातील कॉस्मॉस इंजिनिअरिंग या संस्थेला पाठविण्यात येत होती.

खेप पाठविणार्‍याची लॉजिस्टिक कंपनीची नोंदणी शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक्स कंपनी लिमिटेड म्हणून करण्यात आलेली आहे. खेप स्वीकारणार्‍या लॉजिस्टिक कंपनीचे नाव पाकिस्तान विंग्स प्रायव्हेट लिमिटेड असून, ती सियालकोटची असल्याचे दाखविण्यात आले होते.

याआधीही चीनहून पाकिस्तानला अशा पद्धतीने पाठविण्यात आलेली लष्करी सामग्री भारतीय यंत्रणांनी जप्त केली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये, पाकला औद्योगिक ड्रायर पाठविण्याच्या नावाखाली ऑटोक्लेव (लष्करी सामग्री) पाठविण्यात येत असल्याचे उघडकीला आले होते. पाकिस्तानी पुरवठादार कंपनी कॉस्मॉस इंजिनिअरिंग 2022 पासून भारतीय यंत्रणांच्या 'रडार'वर आहे. याच वर्षात 12 मार्च रोजी भारतीय अधिकार्‍यांनी न्हावाशेवा बंदरात इटलीमेड थर्मोइलेक्ट्रिक इन्स्ट्रूमेंटची एक खेप रोखली होती. जून 2023 मध्ये अमेरिकन उद्योग आणि संरक्षण विभागाने पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित सामग्रीच्या 3 पुरवठादार कंपन्यांवर निर्बंध लादले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news