

पिंपरी(पुणे) : व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तुम्ही आपली गोपनीय माहिती शेअर करीत असाल, तर जरा सावध व्हा… कारण सायबर चोरट्यांनी पोलिसांच्या पुढे एक पाऊल टाकत नामी शक्कल लढवली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून चोरटे फसवणूक करू लागले आहेत. राज्यातील काही भागांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेसाठी नुकतेच एक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार्या गुन्ह्यांवर प्रकाश टाकण्यात आला. सध्या देशात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून 'फेस स्कॅम' सुरू झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या तंत्रज्ञानाचा वापर फसवणूक तसेच गुन्हेगारी करण्यासाठी करीत आहेत. स्मार्ट फोनमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बळी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कोणत्याही व्यक्तीचे फोटो, व्हिडीओ बनवू शकतो. याचा फायदा घेत काही सायबर चोरटे टार्गेट फिक्स करून त्यांच्या सोशल मीडियाची चाचपणी करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या जवळचे नातेवाईक, मित्र, कुटुंबीय यांची माहिती व फोटो मिळवतात. त्यानंतर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो एडीट केला जातो. व्हिडीओ कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्ती व्हिडीओ कॉलवर बोलत आहे, असे भासवले जाते. दरम्यान, व्हिडीओ कॉलद्वारे समोरील व्यक्तीची गोपनीय माहिती घेतली जाते. तसेच, आर्थिक अडचण आहे, मदतीची गरज आहे, अर्जंट पैसे पाठव, असे सांगून पैसे उकळले जातात.
या स्कॅममध्ये मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला जातो. एआयच्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या जवळच्या म्हणजेच पती, पत्नी, मुलगा, मित्र यांचा चेहरा व्हिडीओ कॉलवर दिसतो. त्यामुळे आपल्याला आलेला व्हिडीओ कॉल हा मित्र किंवा जवळच्या व्यक्तीचा आहे, असा भास होतो. या माध्यमातून आरोपी पैशांची मागणी करून, आर्थिक फसवणूक करत आहेत.
एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फेस स्कॅम सुरू झाले आहे. मात्र, यापेक्षाही अजून काही भयानक गोष्टी या माध्यमातून होऊ शकतात. आपला जवळचा व्यक्ती (उदा. पती, प्रियकर, पत्नी, प्रेयसी) आपल्याशी व्हिडीओ कॉल करून खासगी गोष्टींवर चर्चा करू शकतात. काही खासगी गोष्टीही व्हिडीओ कॉलवर होऊ शकतात. याचा गैरफयदा घेऊन काही लोक आपल्याला ब्लॅकमेल करू शकतात. त्यामुळे अनोळखी क्रमांक किंवा सोशल मीडिया साईटवरून आलेल्या व्हिडीओ कॉलवर बोलने टाळावे.