

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक रकमेला जादा परतावा देण्याच्या आमिषाने हर्षवर्धन विश्वास पाटील (रा. इस्लामपूर) यांना 21 लाख रुपयांचा गंडा घालणार्या संशयितांच्या 20 बँकांतील खात्यांमधील 7 कोटी 81 लाख रुपयांची रक्कम गोठविली आहे. दहा दिवसांपूर्वी फसवणुकीचे हे प्रकरण घडले होते.
सागर अंकुश माने (वय 29, रा. इंदौर, मध्य प्रदेश, सध्या भाईंदर पूर्व ठाणे), अशोक महावीर आचार्य (29, अजमेर, राजस्थान, सध्या भाईंदर पूर्व ठाणे) या दोघांना तातडीने अटक करण्यात यश आले होते. त्यांच्याकडून आणखी फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार फरारी आहे. टोळीचे कनेक्शन तामिळनाडू, राजस्थानपर्यंत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
फिर्यादी पाटील यांना टेलिग्राम अॅपवर कॅपिटॅलिक्स कंपनीकडून ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. दि. 23 जुलै ते 26 या दरम्यान 21 लाख रूपये पाटील यांच्याकडून घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संशयिताची वेगवेगळ्या 20 बँकामध्ये खाती आहेत. या खात्यावर ते लोकांनी गुंतवणूक केलेली रक्कम भरून घेत होते. तपासात ही बाब प्रकर्षाने पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी त्या खात्यावरील सात कोटी 81 लाख रुपयांची रक्कम गोठवली. संशयितांनी मुंबईतील जुहू पोलिस ठाण्याच्या हद्दीतही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख तुषार पाटील, उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल चव्हाण, सायबरचे निरीक्षक संजय हारुगडे, हवालदार गणेश झांजरे, अरुण कानडे, सुशांत बुचडे, करण परदेशी, विवेक साळुंखे, इब्रान महालकरी, अजय पाटील, स्वप्नील नायकवडी यांच्या पथकाने तांत्रिक हा तपास केला.