career in arts : कलाक्षेत्रात करिअर करताना…

career in arts : कलाक्षेत्रात करिअर करताना…
Published on
Updated on

सध्याच्या युगात करिअर करण्याच्या सर्वाधिक संधी कला क्षेत्रात उपलब्ध आहेत. कला क्षेत्राचा अर्थ चित्रकारिता लेखन, अभिनय या पुरता मर्यादित नाही. गायन, नृत्य, संगीतरचना अशा अनेक क्षेत्रात कलाकारांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात भरपूर पैशांबरोबर प्रसिद्धीही मिळते आहे. मात्र या गुणवत्तेचे मार्केटिंगही करता येणे गरजेचे आहे.

सध्या जगभर भारतातील नृत्य, संगीत यांच्या विषयीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. भारतीय पारंपरिक नृत्यकला सादरीकरणाला जगभरातून मोठी मागणी आहे. ज्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए यापेक्षाही आव्हान असलेले करिअर करायचे आहे अशांना या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. पाश्चात्य नृत्य प्रकारांना, पाश्चात्य संगीताला ज्याप्रमाणे पूर्वी मागणी होती, तशीच मागणी कथ्थक, भरतनाट्यम या परंपरागत भारतीय नृत्य प्रकारांना सध्या आहे. या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी करावे लागणारे अपार कष्ट विचारात घेतले पाहिजेत. एवढे कष्ट करण्याची तयारी असेल तरच या क्षेत्रात करिअर करावे.

या क्षेत्रात पूर्णपणे करिअर करायचे असेल तर शाळा, महाविद्यालयांमध्ये संगीत, नृत्य शिक्षक म्हणूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याचबरोबर नृत्य, संगीत यांचे प्रशिक्षण देणार्‍या अनेक स्थांमध्ये कलाकारांना प्रशिक्षण देण्याचे काम मिळू शकते. नृत्य, संगीत प्रशिक्षणाच्या खासगी संस्थांमध्ये शिक्षण देण्याचे काम पार्टटाईमही केले जाऊ शकते. नोकर्‍या सांभाळून नृत्याचे, संगीताचे, गाण्याचे कार्यक्रम करणारे अनेक कलाकार आहेत.

ओडिसी, कुचीपुडी, कथ्थक, भरतनाट्यम, लोकनृत्य या परंपरागत नृत्य प्रकारांबरोबरच आधुनिक नृत्य हा प्रकारही समाविष्ट झालेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्य दिग्दर्शकांना (कोरिओग्राफर) हल्ली मोठी मागणी आहे. नृत्य दिग्दर्शनामध्ये नाविन्यांबरोबरच कल्पकतेलाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. नृत्य शिक्षक, नृत्य संयोजक, स्टेज सेटिंग संयोजक, रिहर्सल सुपरवायझर म्हणून तुम्ही करिअरची सुरुवात करू शकता. नृत्य कलेचे शिक्षण घेणार्‍यांना अनेक नाट्यसंस्था, लोककला विषयक संस्था यामध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. याशिवाय तुम्ही खासगी स्तरावर नृत्यकलेचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसायही करू शकता. स्वतःची नृत्य अकादमी सुुरू करू शकता. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रमांमध्ये नृत्य दिग्दर्शन आणि संयोजन करण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता लागते.

नृत्यकलेबरोबरच अभिनय क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील दररोजच्या मालिकांमुळे अभिनेत्यांसाठी मोठे अवकाश उपलब्ध झाले आहे. याचबरोबर नाटकांमध्येही लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय या क्षेत्रात करिअर करता येते. नाट्य क्षेत्रात आपली गुणवत्ता दाखवल्यास बॉलिवूड तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मालिकांचे क्षेत्र आपल्याला खुले होऊ शकते. उमेदवारांनी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभिनय प्रशिक्षणाची पदवी मिळवता येते किंवा पदवीकाही मिळवता येते. तसेच या विषयात पीएच.डी.सुद्धा मिळवता येते.

दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही संस्था जगभरात नावाजली गेली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे. शाळेच्या अथवा महाविद्यालयाच्या स्तरावर नाटकांमध्ये भाग घेतला असेल तर अशा उमेदवारांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. याचबरोबर अभिनय क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती आपल्या पूर्वानुभवाच्या जोरावर अभिनय व त्याच्याशी संबंधित गोष्टीचे प्रशिक्षण देतात.

अवंती कारखानीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news