

12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन युवक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने…
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारताच्या राष्ट्रीयत्वाचा विचार एका संन्याशाच्या तोंडून आला. या संन्याशाने सांगितले की, या सार्या जगाला सांगा की पुण्य, पवित्र अशी ही भरतभूमी जागी होऊ लागली आहे. हे सांगताना तलवार घेऊन सांगा, असं ते म्हणाले नाहीत किंवा पैशाच्या बळावर जग काबीज करा आणि जगाला तुमचं म्हणणं ऐकायला लावा, असंही ते म्हणाले नाहीत. ते म्हणाले, अत्यंत पवित्र आणि मंगलमय सुरात सांगा की, ही पुण्यपवित्र भारतभूमी जागी व्हायला लागली आहे.
स्वामींचं वर्णन योद्धा संन्यासी असं केलं जातं. म्हणजे स्वामी विवेकानंद हा संन्यासी आहे. आपल्या विचारात 'संन्यास' याचा अर्थ ज्याला वैयक्तिक स्वार्थ उरला नाही, पण जो आता विश्वाच्या कल्याणासाठी जगतो आहे. स्वामी विवेकानंद योद्धा होते. त्यांचं युद्ध माणसातील दुष्टपणाविरुद्ध होतं. त्यामुळं मला कायम जाणवत आलं आहे की, स्वामी विवेकानंद हे युवकांचं 'नैसर्गिक दैवत' आहेत. एक शाश्वत युवक आहेत स्वामीजी. त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून साजरा होणे ही भारतासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामध्ये तरी कुठे विचारधारा, राजकीय पक्ष, जातपात, भाषा, प्रांत काहीही आडवं आलेले नाही, हेही सुदैवच म्हणावं लागेल. युवा पिढीचे 'करेक्ट आयकॉन' म्हणजे स्वामीजी.
स्वामीजींचे शब्द आजही ऐकले-वाचले तर ते कधीही जुने वाटत नाहीत. एक विलक्षण ताजेपण आहे त्यांच्या शब्दांत. आपली कशीही मनःस्थिती असो, स्वामीजींचे शब्द समोर आले की, त्यामधून अजूनही पहाटेचा पारिजातकाचा सडा पडतो किंवा फुललेल्या मोगर्याचा वास असतो तसा मंद सुगंध त्यातून येतो आणि तो बळ देतो आपल्याला. जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर हा योद्धा सन्यासी भेटतोच. कधी दम देतो गचांडी पकडून की काय करतोयस तू; तर कधी हसतो आपल्याकडे पाहून की, तू ज्या अनुभवातून चालला आहेस ते अनुभव मीही घेतले आहेत.
स्वामीजींनी त्यांच्या काळात सांगून ठेवले की, एका हाताने अध्यात्म पकडून ठेवा आणि मग दुनियेतील आधुनिकता आत्मसात करा. तो विचार आजही आणि युवकांसाठी कमालीचा लागू होते. आपल्याला सर्व प्रकारची आधुनिकता, विज्ञान तंत्रज्ञान, आर्थिक विकास हवा आहे, रोजगाराच्या संधी हव्या आहेत. या सर्वांचा मूलाधार हा अध्यात्म विचार आहे. 115 वर्षांपूर्वी देखील स्वामीजींनी भारताच्या समस्याचं 'निदान' केलं आणि त्यावर सुचवलेली उत्तरं आजही लागू होतात. ते काम युवकांनाच करायचं आहे.
स्वामीजींनी मांडलेल्या विचारातील असंख्य गोष्टी मला नेहमीच स्मरतात. अनेक परिच्छेदच्या परिच्छेद मला पाठ आहेत. स्वामीजी म्हणत, 'येत्या 50 वर्षांमध्ये देश हा तुमचा देव असू द्या.' यातील देश या शब्दाची त्यांनी केलेली व्याख्या म्हणजे लोक. केवळ नद्या, नाले, डोंगर नाही. देश म्हणजे लोक आणि लोक म्हणजे सर्व. त्या दरिद्रीनारायणाची सेवा करणं हे देशकार्य आहे. ते युवकांना करिअर घडवणं, नोकरी शोधणं, जीवनाची दिशा शोधणं या सर्वांना आजही लागू आहे. त्याच परिच्छेदात स्वामीजींनी पुढं म्हटलं आहे की, आसपास सगळे लोक असताना तुम्ही दगड-धोंड्यांची पूजा का करता? माझ्या मते, फारच मूलगामी आहे हा विचार. जातिव्यवस्थेबाबतही स्वामीजींंनी स्पष्टपणे भूमिका मांडली असून ती आता संपली पाहिजे. काल-परवापर्यंत जातिव्यवस्थेनं ज्या समाजाला परिघाबाहेर ठेवले, अन्याय केला तो दूर होऊन जे सामाजिक अधिकार आहेत ते या घटकाकडे गेले पाहिजेत. स्वामीजींचं हे विश्लेषण माझ्या मते अत्यंत योग्य असून त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मनातील जातीय विषमता दूर होणं गरजेचं आहे.
स्वामीजींनी उद्धृत केलेली काही वाक्यं मनात भिनलेली आहेत. 'रिलिजन इज नॉट फॉर एम्प्टी बेलीज' अर्थात 'धर्म हा रिकाम्या पोटांसाठी नाहीये' हे असंच एक सुवचन. गरिबीची समस्या, कुपोषणाची समस्या आधी सोडवा. रिकाम्या पोटी तुम्ही धर्म सांगू नका. याचाच अर्थ गरिबांची पोटं भरणं हाच खरा धर्म आहे. हे वाक्य घणाघाती आहे.
असंच दुसरं वाक्य म्हणजे, 'यू विल अर्न युवर साल्वेशन मोअर इनफ थ्रू फुटबॉल दॅन थ्रू गीता' असं हा योद्धा संन्यासी म्हणतो. म्हणजेच मुक्तीचा मार्ग भगवद्गीतेपेक्षा फुटबॉल खेळून सापडेल. याचा मतितार्थ म्हणजे बलाची उपासना करा. सामर्थ्याची. नुसतेच गीतेचे श्लोक म्हणू नका. याचा अर्थ भगवद्गीता म्हणू नका असा नाही. पण मैदानात जा, भरपूर खेळा, अंग घामानं थबथबलं होऊ दे. सामर्थ्याच्या जोपासनेत गीतेची उपासना करा. हाही संदेश अत्यंत मौलिक आहे.
युवकांसाठी तर स्वामीजींनी जीवनमंत्रच दिला आहे. ते म्हणतात, कोणत्या तरी एका विचाराचा ध्यास घ्या. तो एक विचार म्हणजे तुमचे जीवन बनू दे. दिवस-रात्र त्याचं चिंतन, त्याचा अभ्यास करा. तरच तुमच्यातून कर्तव्य फुलून येईल. माझ्या मते युवकांसाठी हे 'परफेक्ट सोल्युशन' आहे.
आजची तरुण पिढी चुकीच्याच रस्त्यावर आहे, असं मला अजिबात वाटत नाही. आजचं युग विज्ञानाचं आहे. स्वामीजींनी मांडलेला अध्यात्म विचार हा विज्ञाननिष्ठच आहे. जाणारा प्रत्येक दिवस विज्ञानाची होणारी प्रगती आपल्याला अध्यात्माकडं घेऊन जाते. अध्यात्म आणि विज्ञान यांच्यात फरक, द्वैत अजिबातच नाही. स्वामीजी युवकांना सांगतात की, मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका. स्वतंत्र विचार करा. कोणीही काहीही सांगत असलं तरी तुमच्या स्वतंत्र विचारांना जे पटतंय तेच करा. यामध्ये पुन्हा बुद्धिनिष्ठा, विवेकनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा येते. त्याचवेळेला आत्मविश्वासही येतो. स्वतंत्र विचार करूनच मी ज्या मुक्कामाला पोहोचलो त्या मुक्कामाला पोहोचणार आहात, याचा अर्थ प्रतिभेची जोपासना हाही विचार यामध्ये दिसतो.
9/11 हा आजच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस. अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला, त्यादिवशीची दृश्यं पाहून मला आठवले स्वामीजी. जिथे अध्यात्म, जिथे वेदांतांच्या विचारांचा परिपोष होतो आणि तो वेदांत म्हणजे माणसा-माणसांत जातीपातीत भिंती उभा करणारा नाही; तर ईश्वर सर्वत्र भरलेला आहे आणि आपलं जगणं याचा अर्थ तो ईश्वर व्यक्त करायचा आहे, सर्व धर्मांचा-विचारधारांचा समान आदर आहे. कुणावरच ईश्वर मानण्याचीही सक्ती नाही. कारण आपण सर्व अंती एकाच मुक्कामावर पोहोचणार आहोत. तो वेदांत. तो पाया मानतो तो हिंदू धर्म. तोच भारताच्या राष्ट्रीयत्वाचा आधार हे स्वामीजींनी जागतिक परिषदेत जाहीर केलं आणि तोच आजच्या आणि उद्याच्या विश्वबंधुत्वाचाही आधार आहे.
अविनाश धर्माधिकारी
माजी सनदी अधिकारी