

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली- पेठ रस्त्यासाठी अखेर 881 कोटी 87 लाख रुपये मंजूर झाले आहेत. केंद्रीय अर्थिक समितीने आज त्याला मंजूरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या या रस्त्याचे काम आता सुरु होणार आहे. हा महामार्ग 41.25 किमी मार्गाच्या 4-लेन कॉन्फिगरेशनमध्ये अपग्रेडेशन कार्याला ईपीसी मंजूरी देण्यात आली आहे. तशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मिडीयाव्दारे दिली आहे. दरम्यान या रस्त्यासाठीची टेंडर प्रक्रिया 23 जानेवारी पासून सुरु होणार आहे.
सांगलीला महामार्गाशी जोडण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. त्या प्रमाणे चार वर्षापूर्वी हा रस्ता राज्य सरकारकडून केंद्राकडे हस्तांतर करण्यात आला. सांगलीला महामार्गाशी जोडले गेले नाही. मात्र या रस्त्यातील खड्ड्यामुळे या मार्गाची बदनामी मोठ्या प्रमाणात झाली. येथील सर्वपक्षीय कृती समितीने रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले. रस्त्यासंदर्भात राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्यावरही जोरदार टिका झाली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ना. गडकरी हे येथे आले असता हा रस्ता लवकर होईल, अशी घोषणा झाली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. रस्ता करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली. त्या प्रमाणे टेंडर प्रक्रिया ही सुरु झाली होती. मात्र अर्थिक मंजूरी मिळाली नव्हती. त्यावरून ही जोरदार टिका झाली. आजी- माजी पालकमंत्र्यांना या रस्त्याबाबत टार्गेट करीत टिका करण्यात आली. अखेर आज दिल्ली येथे केंद्रीय अर्थिक समितीने या रस्त्याच्या कामासाठी 881 कोटी 87 लाख रुपये मंजूर केले . तशी माहिती ना. गडकरी यांनी जाहीर पणे सोशल मिडीयावरून दिली आहे.
दरम्यान ना. गडकरी यांनी केलेल्या या घोषणामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. याबद्दल ना. गडकरी, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपनेते शेखर इनामदार यांचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान या चारपदरी रस्त्यासाठीच्या मार्गावरील पूल व त्याजवळील सेवारस्त्यांसह सर्व आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या रस्त्याला प्राधिकरणामार्फत टोल आकारणी होणाक आहे. त्याशिवाय या रस्त्यासाठी 'ईपीसी' निविदा प्रक्रिया असेल. अभियांत्रिकी आराखडे तयार करणे, त्यानुसार साहित्य खरेदी, देखरेख आणि बांधकाम अशा सर्व जबाबदार्या ठेकेदाराच्याच असणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा अधिक प्रकल्पखर्च असणार नाही.
असा असेल महामार्ग
चारपदरी रस्त्याची दोन्हीकडे प्रत्येकी साडेसात मीटर रुंदी असणार आहे. मधोमध 0.60 मीटरचा दुभाजक असणार आहे. एकूण दहा ठिकाणी लहान-मोठे पूल होणार आहेत. तेथे फक्त सेवारस्त्यासाठी काहीसे भूमिसंपादन होणार आहे.
सांगली- पेठ रस्त्याबाबत लोकांच्या भावना तीव्र होत्या. त्याच्या अर्थिक मंजूरीसाठी पाठपूरावा सुरु होता. आज केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांनी मंजूरी दिली. सुरुवातीस 611 कोटी रुपयाची मंजूरी होती. मात्र या रस्त्यावरील पूलाचे वाढीव काम लक्षात घेऊन 882 कोटी मंजूर केले आहेत. या रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल, त्यासाठी ना. गडकरी यांना निमंत्रीत करण्यात येणार आहे.
सुरेश खाडे, पालकमंत्री , सांगली.