कोल्हापूर-सांगली रस्ता 850 कोटींचा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे धूळ खात

file photo
file photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे 850 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या हाय पॉवर कमिटीकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तातडीने मंजूर होण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. या आराखड्यात हातकणंगलेसह विविध ठिकाणी उड्डाण पुलाचे नियोजन आहे.

वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करायला भाग पाडणार्‍या कोल्हापूर-सांगली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यापूर्वी हा रस्ता सुप्रिम कंपनीकडे 'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर दिला होता; मात्र ठेकेदाराने केवळ 65 ते 70 टक्के काम करून टोल लावण्याची भूमिका घेतल्याने वाद सुरू झाला. ठेकेदार आणि राज्य शासनाच्या वादामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यास अडचण होती. मात्र नुकतेच या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले आहे. हस्तांतरानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या मार्गाचे सर्वेक्षण करून अहवाल केंद्र सरकारला पाठविला आहे.

या अहवालानुसार प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा तीन ते चार महिन्यांपूर्वी दिल्ली येथील हाय पॉवर कमिटीकडे पाठविला आहे. या कमिटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया केली जाणार आहे.

या मार्गावरील अनेक ठिकाणी सेवामार्ग गायब आहेत. हातकणंगले, अतिग्रे, निमशिरगाव तमदलगे आदी ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या मार्गावर अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र बनल्याने वारंवार अपघात होतात. हातकणंगले आयटीआय, मजले, लक्ष्मीवाडीत रस्ता खचल्याने अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्तादुभाजकांची दुरवस्था असून रस्ता दुभाजकच अपघातास निमंत्रण देत आहेत.

सत्ताधारी खासदार असूनही प्रस्ताव धूळ खात

जिल्ह्यात लोकसभेचे दोन आणि राज्यसभेचा एक असे तीन खासदार आहेत. हे तिन्ही खासदार महायुतीचे म्हणजेच केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आहेत. या तिन्ही खासदारांनी पाठपुरावा केला तर प्रस्ताव मंजूर होण्यास फार वेळ लागणार नाही, अशी नागरिकांत चर्चा आहे. खासदारांकडून या कामांसाठी पाठपुरावा का, असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news