

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशातील पूर्वीच्या सरकारने 70 वर्षांच्या काळात 6.37 लाख प्राथमिक शाळा उभारल्या. परंतु, मोदी सरकारने 8 वर्षांच्या कार्यकाळातच 6.53 लाख प्राथमिक शाळा उभारल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देश जागतिक शिक्षणाच्या द़ृष्टीने मार्गक्रमण करीत आहे, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करीत मोदी सरकारच्या 8 वर्षपुर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान, नड्डा यांनी पत्रकार परिषदेतून मोदी सरकारच्या कल्याणकारी निर्णयांची माहिती दिली.
या वेळी त्यांनी 'नमो अॅप'चे अद्ययावत अॅप लाँच केले. नड्डा म्हणाले, पंतप्रधानांच्या कामांमध्ये सदैव 'इनोव्हेशन' दिसून येते. याच इनोव्हेशन अंतर्गत पंतप्रधानांनी 'नमो अॅप' या मायक्रोसाईटवर एक मॉड्यूल उभारले असून ते माहिती तसेच इनोव्हेशन युक्त आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. 'सेवा-सुशासन-गरीब कल्याण' ही मोदी सरकारच्या काम करण्याची पद्धत आहे. आणि हाच मोदी सरकारचा आत्माही आहे.
80 कोटी गरिबांना नि:शुल्क धान्य
नड्डा म्हणाले, गरीब कल्याण अन्न योजनेचे जागतिक पातळीवर कौतुक करण्यात आले आहे. कोरोना काळातील संकटात आरोग्यासंबंधी समस्यांच्या निराकरणासोबतच आर्थिक समस्यांची सोडवणूक करणार देश कुठला असेल तर तो भारत आहे, असे नड्डा म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून जवळपास 80 कोटी गरिबांना 5 किलो नि:शुल्क शिधा दिला जात आहे.
शेतकर्यांच्या खात्यात 1 लाख 80 हजार कोटी
किसान सन्मान निधी अंतर्गत पंतप्रधानांनी दरवर्षी 2 हजार रुपयांचा तीन हफ्त्यांनुसार आतापर्यंत 10 हफ्ते शेतकर्यांना दिले आहेत. तसेच 1 लाख 80 हजार कोटी रुपये यावर खर्च करण्यात आले आहेत. उद्या, मंगळवारी पंतप्रधान शिमलातील रिज मैदानावरून या योजनेचा 11 वा हफ्ता जारी करणार असल्याचे नड्डा म्हणाले.