मृत्युदंडाची शिक्षा झालेले 8 भारतीय अधिकारी सुटणार?

मृत्युदंडाची शिक्षा झालेले 8 भारतीय अधिकारी सुटणार?
Published on
Updated on

दोहा/नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विशाखापट्टणमचे रहिवासी सुगुणाकर पकाला यांचा 18 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यापूर्वी ते भारतात परततील, असा विश्वास त्यांच्या मुलाला आहे. सुगुणाकर यांच्यासह 8 माजी भारतीय नौदल अधिकार्‍यांना कतारमधील न्यायालयाने इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. कतारसारख्या इस्लामिक देशात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले हे माजी नौदल अधिकारी मायदेशी परततील की नाही, याबद्दल या अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांसह अवघ्या देशाला उत्सुकता आहे. ते परतावेत, अशी प्रार्थनाही सारे करत आहेत.

काय झाले होते?

* 30 ऑगस्ट 2022 रोजी हे सारे अधिकारी कतारमध्ये आपापल्या घरी झोपलेले असताना कतारचे गुप्तचर अधिकारी आले आणि या सगळ्यांना कोणतेही कारण न सांगता अटक केली गेली.
* सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. हे सर्व अधिकारी कतारच्या नौदलाला प्रशिक्षण देणार्‍या दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी अँड कन्सलटन्सी या खासगी कंपनीसाठी काम करत होते.
* ओमान हवाई दलाचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर खामिस अल आझमी हे कंपनीचे प्रमुख आहेत. आझमी यांनाही या 8 भारतीयांसह अटक करण्यात आली होती; मात्र गतवर्षी नोव्हेंबरमध्येच त्यांची सुटका झाली.

भारतीय अधिकार्‍यांवर नेमके आरोपपत्र काय?
* अल-जझिराच्या वृत्तानुसार, या आठही जणांनी कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित माहिती इस्रायलला पुरविल्याचा आरोप आहे.
* कतारने इटलीकडून पाणबुड्या खरेदी केल्या आहेत. या पाणबुड्या खूप लहान आहेत आणि रडारनेही त्यांचा वेध घेता येत नाही.
* शिक्षा सुनावण्यात आलेल्या 8 भारतीय अधिकार्‍यांनाही स्वाभाविकपणे याबद्दलची माहिती होती, ती त्यांनी इस्रायलला पुरविली, असे कतार स्टेट सिक्युरिटी या कतारच्या गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.
* इस्रायलला गुप्त बातम्या देण्यासाठी या भारतीय अधिकार्‍यांनी तयार केलेली यंत्रणा हस्तगत केल्याचा दावाही कतार गुप्तचर यंत्रणेने केला आहे.

मृत्युदंड सुनावण्यात आलेले हे ते 8 अधिकारी

* कॅप्टन नवतेजसिंग गिल : गिल हे चंदीगडचे आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
* कमांडर पूर्णेंदू तिवारी : नेव्हिगेशनमध्ये तज्ज्ञ आहेत. आयएनएस मगर या युद्धनौकेचे नेतृत्व केले आहे. दाहरा कंपनीत व्यवस्थापकीय संचालक होते. पूर्णेंदू तिवारी यांना 2019 मध्ये भारत आणि कतारमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
* कमांडर सुगुणाकर पकाला : 54 वर्षांचे सुगुणाकर हे विशाखापट्टणमचे रहिवासी आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी ते नौदलात रुजू झाले होते. नोव्हेंबर 2013 मध्ये ते निवृत्त झाले. नंतर ते कतारच्या अल दाहरा कंपनीत रुजू झाले.
* कमांडर संजीव गुप्ता : गुप्ता हे तोफखाना विशेषज्ञ म्हणून ओळखले जातात. आपल्या नौदलातील कारकिर्दीत अनेक मोहिमांचे यशस्वी नेतृत्व त्यांनी केले आहे.
* कमांडर अमित नागपाल : नौदलातील दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीतील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
* कॅप्टन सौरभ वशिष्ठ : वशिष्ठ हे कुशल तांत्रिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक जटिल जबाबदार्‍या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.
* कॅप्टन बीरेंद्रकुमार वर्मा : वर्मा हे त्यांच्या नेव्हिगेशन कौशल्यासाठी ओळखले जातात.
* नाविक रागेश : रागेश हे नौदलात देखभाल आणि मदतनीस म्हणून काम करत असत.

तूर्त अधिकार्‍यांच्या सुटकेसाठी हे 2 मार्ग

1 दोहा येथील ट्रायल कोर्टाने हा निकाल दिला आहे. त्याविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करणे.
2 या निकालाविरोधात भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील करू शकतो. यूएन चार्टरच्या कलम 94 नुसार, संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशावर निर्णय बंधनकारक आहे.

कुलभूषण यांचे उदाहरण

हेरगिरी प्रकरणात याआधी पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केले होते. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली होती.

इटालियन नौसैनिकांकडून दोन भारतीयांच्या हत्येचे प्रकरण

2012 मध्ये घडलेली ही घटना… इटालियन नौसैनिकांनी केरळ किनारपट्टीवर 2 भारतीय मच्छीमारांची हत्या केली होती. भारतीय पोलिसांनी याप्रकरणी 2 इटालियन खलाशांना अटक केली. त्याविरोधात इटलीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केले. मच्छीमार हे समुद्री चाचे (लुटारू) आहेत, असा आमच्या नौसैनिकांचा गैरसमज झाला आणि यातून त्यांनी गोळीबार केला, असा इटलीचा स्टँड होता. न्यायालयाने तो ग्राह्य धरला आणि दोन्ही खलाशांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

भारत-कतार संबंध थोडे कडू, थोडे गोड

* गतवर्षी जूनमध्ये भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टी.व्ही. शोमध्ये केलेल्या टिपणीला कतारने सर्वात आधी आक्षेप घेतला होता. कतार सरकारने भारतीय राजदूताला बोलावून जाबही विचारला होता.
* गतवर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या प्रमुखांना फिफा (फुटबॉल) विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या. कतारप्रमुखांनीही मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.* इस्रायल-हमास युद्धात भारत इस्रायलच्या, तर कतार हमासच्या बाजूने आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news