

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी भागातील दाणा बाजार येथे कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यात दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. ही घटना आज (दि.३) पहाटे चार वाजता घडली.
हमिदा बेगम अब्दुल अजीज (वय ५०), शेख सोहेल अब्दुल अजीज (वय ३५), रेश्मा शेख सोहेल शेख (वय २५), वसीम शेख अब्दुल आजीज (वय ३०), तनवीर वशिम शेख (वय २३), असीम वसीम शेख (वय ३) आणि परी वसीम शेख (वय २), अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
आग लागलेल्या या इमारतीत पहिल्या मजल्यावर ७, दुसऱ्या मजल्यावर ७ आणि तिसऱ्या मजल्यावर २, असे एकूण १६ लोक राहत होते. यातील दुसऱ्या मजल्यावर सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनास्थळी शहराचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी भेट दिली असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.