

लखनौ, पीटीआय : उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने गेल्या तीन वर्षांत केवळ 156 उंदीर पकडण्यावर तब्बल 69 लाख 40 हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी विचारलेल्या प्रश्नात रेल्वेकडून हा तपशील उघड करण्यात आला आहे.
गणित मांडायचे झाले तर रेल्वेच्या लखनौ विभागाने सहा दिवसांत एक उंदीर पकडला आणि त्यावर 41 हजार रुपये खर्च केले. हा मुद्दा पकडून काँग्रेस नेते रणदीप सूरजेवाला यांनी देशात जागोजागी असे भ्रष्टाचाराचे उंदीर सापडले, अशी शेरेबाजी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकट्या लखनौ विभागात ही स्थिती असेल तर अन्यत्र कशी परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.
रेल्वेकडून स्पष्टीकरण
यासंदर्भात रेल्वेनेही आपली बाजू मांडली आहे. ही रक्कम केवळ उंदीर पकडण्यावर खर्च झालेली नाही. रेल्वेत होणारा डास, ढेकूण, झुरळ, पाली आदींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने विविध द्रव्यांची फवारणी केली जाते. उंदीर पकडण्याबरोबरच अन्य प्रतिबंधक उपायांचा समावेश असल्याचा खुलासा रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केला आहे.