भाजप उद्धवग्रस्त का झाला आहे? : उद्धव ठाकरे

भाजप उद्धवग्रस्त का झाला आहे? : उद्धव ठाकरे
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वर्षभरात आपल्या पक्षाचे नाव चोरले, पक्ष चोरला आणि वडीलही चोरायला निघाले होते. हे सर्व झाल्यावर उद्धव ठाकरेला काय किंमत उरली होती, तरीही अमित शहांना वारंवार महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे नावाचा जप का करावा लागतो, भाजप नेत्यांचे उद्धव ठाकरेच्या नावाशिवाय पान हलत नाही. एकूणच भाजप उद्धवग्रस्त का झाला आहे, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला. तसेच राज्यातील गद्दार आणि त्यांना प्रोत्साहन देणार्‍या भाजपच्या छाताडावर पुन्हा एकदा भगवा फडकवणार, असा निर्धारही व्यक्त केला.

शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन येथील षण्मुखानंद सभागृहात सोमवारी सायंकाळी शिवसैनिकांच्या तुफान गर्दीत, जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे म्हणाले की, काँग्रेससोबत गेलो म्हणून सतत आपल्या हिंदुत्वावर प्रश्न केला जातो. पण, सध्याच्या या हिंदुत्ववाद्यांच्या सरकारमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशातील हिंदूना आक्रोश करावा लागत आहे. हिंदूंचीच फसगत झाली आहे. मग, भाजप सरकार कसले हिंदुत्ववादी. काँग्रेस सरकारच्या काळात 'इस्लाम खतरे मैं'च्या घोषणा व्हायच्या. आज, हिंदू आक्रोश करत असतील तर खरे हिंदुत्ववादी कोण, असा प्रश्न करतानाच हिंदू मारला जात असताना तुम्ही मात्र देशातील राजकीय शत्रूंना संपवण्याचा प्रयत्न करीत आहात. चीनसमोर शेपूट घालता आणि तेच शेपूट ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमच्यावर उगारता. ही मन की बात नाही तर मणिपूरकी बात आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.

कालच्या शिवसेना पदाधिकार्‍यांच्या शिबिरात आपण जाणीवपूर्वकच मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, पंतप्रधानांवरील टीका भाजपला भलतीच झोंबली आहे. कायद्याचे राज्य संपुष्टात येऊन तेथील जनता पिसाळली की काय होते याचे प्रत्यंतर मणिपूरमध्ये येत आहे. जनता पेटली की हुकूमशाहालाही पळून बिळात लपावे लागते.

मोदी सरकार देश चालवायला नालायक ठरले असून डबल इंजिन केवळ हवेत वाफा सोडत असून पुढे सरकत नसल्याची जहरी टीकाही त्यांनी मोदी-शहा यांच्यावर केली. त्यातच कोरोना प्रतिबंधक लस मोदींनी तयार केली असा जावईशोध लावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हास्यजत्रेचा प्रयोग करून राज्यातील जनतेचे मनोरंजन केल्याची कोपरखळी त्यांनी हाणली.

मणिपूरवरून पंतप्रधानावर टीका केल्यानंतर सूर्यावर थुंकू नका, असा इशारा मिंध्यांनी दिला. मग, तुमचा हा सूर्य मणिपूरमध्ये का उगवत नाही, तुमच्या सूर्याचे करायचे काय, अशा शब्दांत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले. तसेच, आज इकडे गर्दी असून तिकडे गारदी आहेत. सगळेच अवली आहेत, पण लव्हली कोणीच नाही. तुम्ही अवली असले तरी जनता कावली आहे. तुम्ही सगळे मानसिक रुग्ण असून तुमच्यावर उपचारांची गरज असल्याचा हल्लाबोल त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर केला.

भाडोत्री, विकाऊं नी सोडून जावे

पक्षातील कोणी गद्दारांच्या कळपात गेला की उद्धव ठाकरेंना धक्का,अशी आवई उठवली जाते. पण शिवसेना धक्काप्रूफ असून शिवसेनेला आव्हाने नवीन नाहीत. पक्षातील अनेकांना फोन करुन फोडण्यापेक्षा माझ्याकडे यादी द्या, त्यांना मी तुमच्याकडे पाठवतो. तसेच पक्षात अजूनही कोणी भाडोत्री विकाऊ असतील तर त्यांनी अजूनही सोडून जावे. जोवर ज्यांच्या हृदयात बाळासाहेब आहेत असे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोवर कसलीही चिंता नाही. सध्या पक्षात जे आहे, ते बोगस बियाणे नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हिमतीने उभे राहू आणि गद्दार मिंधे आणि भाजपच्या छाताडावर भगवा फडकवू, अशी ग्वाही त्यांनी शिवसैनिकांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news