

किशोर बरकाले
पुणे : केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्यातून सुरू असलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत (पीएमएफएमई) राज्यात सप्टेंबर 2021 पासून आत्तापर्यंत 2 हजार 849 प्रकल्पांना बँक कर्ज मंजुरी मिळाली आहे. राज्यात या कृषी प्रकल्पांमधून सुमारे 300 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली. दरम्यान, बँकांकडून कर्ज मंंजुरीच्या प्रस्तावांमध्ये नागपूर विभागात सर्वाधिक 547, दुसर्या स्थानावरील पुणे विभागात 511 आणि तिसर्या स्थानावरील कोल्हापूर विभागात 449 प्रकल्पांचा समावेश आहे, तर अन्य विभागांमधून कोकण -369, नाशिक- 280, औरंगाबाद -235, लातूर -144 तर अमरावतीतील 314 प्रस्तावांना बँकांनी कर्ज मंजूर केल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना भांडवली गुंतवणुकीकरिता बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाते. त्याकरिता www. pmfme. mofpi. gov. in या संकेतस्थळावरील PMFME MIS PORTAL वर ऑनलाईन अर्ज करता येतात. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी, स्वयंसाहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्थांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीकरिता बँक कर्जाशी निगडित अनुदान दिले जात आहे.
पीएमएफएमई ही केंद्र पुरस्कृत योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. सध्या कार्यरत व नव्याने स्थापित होणार्या उत्पादनांमध्ये कार्यरत सूक्ष्म अन्नप्रक्रिया प्रकल्पांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तरवृध्दी या लाभांसाठी प्रकल्प पात्र आहेत. योजनेत केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाचे प्रमाण अनुक्रमे 60 व 40 टक्क्यांइतके आहे.
पीएमएफएमई अंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये तरुण शेतकर्यांसह महिलांचा वाढता सहभाग हे या योजनेचे खरे यश म्हणावे लागेल. शिवाय प्रक्रिया समूहामधून थेट बाजारपेठ मिळविण्यासाठी पावले उचलण्यामुळे व्यापारास गती येण्याची अपेक्षा आहे. बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्पांसह गत 15 महिन्यांत राज्यात तीनशे कोटी रुपयांची गुंंतवणूक झाली असून, सुमारे 25 हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
– हरी बाबतीवाले, कृषी उपसंचालक, कृषी प्रक्रिया व नियोजन, कृषी आयुक्तालय
पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश असून, आतापर्यंत 511 अन्नप्रक्रिया उद्योगांना बँकांनी कर्ज मंजूर केले आहेत, तर सुमारे 889 प्रस्ताव कर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातून सुरू होत असलेल्या प्रक्रिया उद्योगांमध्ये प्रामुख्याने भाजीपालाप्रक्रिया, फळप्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थनिर्मतिी, तृणधान्य व खाद्यतेलांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
– रफिक नाईकवडी, विभागीय कृषी सह संचालक, पुणे विभाग.