

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत 3 लाख 15 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अमेरिकन तपास यंत्रणांना दिली आहे. 22 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या युद्धापूर्वी 3 लाख 60 हजार रशियन सैनिक होते.
'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या माहितीनुसार युद्धात आतापर्यंत 87 टक्के रशियन सैनिक मारले गेले आहेत. यामुळे रशियन लष्कराचे आधुनिकीकरण करण्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, देशाला 15 वर्ष मागे ढकलले आहे. युद्धातील नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी रशियाकडून आता कैद्यांची लष्करात भरती केली जात असून, त्यांना युद्ध भूमीवर पाठवले जात आहे.
मंगळवारी (12 डिसेंबर) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की वॉशिंग्टनमध्ये पोहोचले होते. यादरम्यान अमेरिकन तपास यंत्रणांनी युद्धा संबंधीचा एक अहवाल अमेरिकेच्या संसदेत सादर केला. विरोधी पक्ष रिपब्लिकने अमेरिकेकडून युक्रेनला दिल्या जात असल्याच्या अतिरिक्त मदतीवर आक्षेप घेतला आहे. व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनने माघार घ्यावी आणि रशियाच्या कब्जाला मान्यता द्यावी, असे काही देश सांगत आहेत; पण पूर्णपणे चुकीचे आहे. युक्रेनने पराभव कशासाठी स्वीकारावा.
मंगळवारी उशिरा रात्री युक्रेनच्या मोबाईल नेटवर्कवर सर्वात मोठा सायबर हल्ला झाला. यामुळे इंटरनेट आणि संवाद सेवा ठप्प झाली आहे. कीव्ह स्टार नेटवर्ककडून 2 कोटींहून अधिक लोकांना इंटरनेट सेवा दिली जाते. या हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा संशय युक्रेनच्या तपास यंत्रणेने व्यक्तकेला.