

पुढारी ऑनलाईन डेस्क : Myanmar Army Air Strike : म्यानमारच्या काचिन राज्यात विस्थापितांच्या शिबिरावर लष्कराने केलेल्या हल्ल्यात 29 जणांचा मृत्यू झाला असून त्यात महिला, लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. त्याचवेळी 59 जण गंभीर जखमी झाले. काचिन पीस नेटवर्क सिव्हिल सोसायटी ग्रुपमधील प्रमुख स्थानिक कार्यकर्त्या खोन जा यांनी रॉयटर्सला याबाबत माहिती दिली.
विस्थापित लोकांसाठी उभारण्यात आलेला कॅम्प काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशन (KIO) च्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात आहे. सोमवारी मध्यरात्री हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशन (KIO) या संघटनेची गणना म्यानमारमधील वांशिक बंडखोर गटांमध्ये केली जाते जी अनेक दशकांपासून त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत.
म्यानमार हा देश सध्या संघर्षाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वांशिक अल्पसंख्याक संघटना आणि प्रतिकार चळवळींनी लष्करी राजवटीविरुद्ध लढा पुकारला आहे. त्यातच 2021 च्या सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये लष्कराने जोरफार कारवाई करण्यास सुरोवात केली आहे.
लष्कराने सोमवारी मध्यरात्री अचानक बॉम्ब हल्ला केला. ज्यात संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले आहे. तब्बल 63 वर्षांनंतर काचिनमध्ये असा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. म्यानमार गेल्या दोन वर्षांपासून अनेक क्षेत्रात संघर्षात अडकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये लष्करी राजवट परत आल्यापासून नागरिकांवरील हा सर्वात मोठा प्राणघातक हल्ला आहे. शॅडो नॅशनल युनिटी गव्हर्मेंट (NUG)ने या हल्ल्यासाठी लष्कराला जबाबदार धरले आहे.
म्यानमारच्या लष्कराला जुंटा असे म्हटले जाते. जुंटाने 1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारमधील सरकार उलथून टाकले. तेव्हापासून देशात लष्करी राजवट लागू आहे. जुंटाच्या सत्तेखाली आल्यानंतर म्यानमारमधील परिस्थिती अत्यंत खडतर झाली आहे. येथील लोकांवर अनेक निर्बंध लादले गेले आहेत. जुंटा विरोधात आंदोल केले असता तुरुंगवासाची शिक्षा दिली जाऊ लागली आहे.