

अवसरी बुद्रुक: अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भोकरशेतवस्ती येथे रविवारी रात्री बिबट्याने शेतकरी संतोष किसनराव हिंगे यांच्या पोल्ट्रीच्या तारा तोडून कोंबड्यावर ताव मारला. यामध्ये हिंगे यांच्या अंदाजे २५० गावठी कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, अवसरी बुद्रुक वळसेमळा मार्गे निरगुडसर रस्त्यालगत भोकरशेत वस्ती आहे. या ठिकाणी संतोष हिंगे यांची पोल्ट्री असून, त्यांच्या पोल्ट्रीमध्ये ५०० गावठी कोंबड्या आहेत. या कोंबड्यांची पूर्णपणे वाढ झालेली असून दोन-तीन दिवसांतच या कोंबड्या मुंबई येथे विक्रीसाठी पाठविणार होते. रविवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान बिबट्याने पोल्ट्री शेडच्या तारा तोडत पोल्ट्रीत प्रवेश करून सुमारे २०० ते २५० कोंबड्यांचा फडशा पाडला.
संतोष हिंगे यांच्या पत्नी कल्पना हिंगे या रात्री वीज गेल्यानंतर जाग्या झाल्या. त्यांनी बंगल्याच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना कोंबड्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी बिबट्यालाही पाहिले. मात्र, वीज नसल्याने त्या घराबाहेर आले नाहीत. सोमवारी (दि. १७) सकाळी उठल्यानंतर त्यांनी पोल्ट्रीचा शेडचा दरवाजा उघडून पाहिले असता बिबट्याने तारा तोडून पोल्ट्रीतील २०० ते २५० कोंबड्या मारल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. यामध्ये त्यांचे सुमारे ७० हजार रुपये नुकसान झाले आहे. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.