

वॉशिंग्टन : एका नव्या संशोधनामधून असे दिसून आले आहे की महासागरांमध्ये प्लास्टिक कचरा फेकण्याची गती अशीच राहिली तर 2040 पर्यंत महासागरांमधील प्लास्टिक कचरा तिप्पट होण्याची शक्यता आहे. 2005 नंतर महासागरांमध्ये प्लास्टिक फेकण्याचे प्रमाण अतिशय वाढले असल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे.
प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध काम करणार्या 'फाईव्ह जाइर्स इन्स्टिट्यूट' या अमेरिकन संस्थेकडून याबाबतचे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की 2019 पर्यंत जगभरातील महासागरांमध्ये 171 ट्रिलियन टन प्लास्टिक तरंगत होते. जर हाच वेग राहिला तर 2040 पर्यंत त्याचे प्रमाण तिप्पटीने वाढू शकते.
मायक्रोप्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकचे अतिशय सूक्ष्म कण हे महासागरांसाठी विशेषतः हानिकारक असतात. ते केवळ पाण्याचेच प्रदूषण करतात असे नाही तर अनेक सागरी जलचरांनाही हानिकारक ठरतात. समुद्रातील मायक्रोप्लास्टिकच्या धोक्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहण्यात आलेले नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधनात 1979 पासून 2019 पर्यंत सहा सागरी क्षेत्रांमधील 11,777 ठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणार्या प्लास्टिक कचर्याचे अध्ययन करण्यात आले.