

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दोन हजार रुपयांची नोट जमा करून अन्य चलनात बदलून घेण्याचा शनिवारी (दि. 7) शेवटचा दिवस होता. रविवारपासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद झाली आहे. यापूर्वीच ग्राहकांनी या नोटा जमा केल्याने बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत दोन हजार रुपयांची नोट बँकेत जमा करण्यास अंतिम मुदतवाढ दिली होती. भारत सरकारने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरू केली होती.
उपलब्ध माहितीनुसार, भारतात यापूर्वी 100, 5000 आणि 10 हजार रुपयांची नोट बंद झाली होती. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली होती. आरबीआयने 10 हजार रुपयांची नोट 1938 साली छापली होती. जानेवारी 1946 मध्ये ही नोट बंद करण्यात आली. 1954 मध्ये पुन्हा 10 हजार रुपयांची नोट चलनात आली. 1978 मध्ये चलनातून रद्द करण्यात आली. 500 आणि 2 हजार रुपायांची नोट चलनात आली. यापैकी आता 2 हजार रुपायांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.